परीक्षण – मनाला भावणारी लोभस व्यक्तिचित्रे
Marathi December 07, 2025 09:26 AM

>> श्रीकांत आंब्रे

सामाजिक बांधिलकीचं भान जपत प्रकाशन व्यवसायात सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि प्रकाशक बाबा भांड यांचं चौफेर कर्तृत्व महाराष्ट्राला परिचित आहे. सर्जनशील ललित लेखक म्हणून त्यांची ख्याती आहेच, पण त्याचबरोबर मराठवाडय़ातील ग्रंथालय चळवळ जोपासणारे, पाणलोट विकास कार्य करणारे, फळबाग लागवडीला मदत करणारे; अनुभव, ज्ञान आणि सामाजिक आकलनाची जाण असणारे समृद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

संपूर्ण जग फिरलेल्या बाबा भांड यांच्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे. त्यातूनच त्यांच्या `साथसंगत’ या लेखसंग्रहात त्यांनी गेल्या पन्नास वर्षांत त्यांच्या जीवनात आलेल्या व त्यांना प्रभावित करणाऱ्या आवडत्या माणसांची व्यक्तिचित्रं रेखाटली आहेत. सोपी भाषा, माणुसकीचा ओलावा आणि मदत करणाऱयांबद्दलची कृतज्ञता त्यांच्या `साथसंगत’मध्ये प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळेच लेखकाचं हे निर्मळ लेखन वाचकांशी सहज हृदयसंवाद साधून जातं.

या व्यक्तिचित्रांमध्ये साहित्य, संशोधन, प्रकाशन, आरोग्य, अध्यात्म, राजकारण, समाजकारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींच्या तसेच अल्पकाळ सहवासात आलेल्या आणि जीव लावून गेलेल्या काही व्यक्तींचा आणि स्थानांचाही समावेश आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे त्यांचे कालेजमधील शिक्षक, गुरू आणि मार्गदर्शक. त्यांनीच आपल्या या आवडत्या विद्यार्थ्यामधील गुण हेरून त्यांच्या लेखनाला ऊर्जा आणि प्रकाशन विश्वातील पदार्पणाला प्रेरणा दिली. आपल्याला फारसे माहीत नसलेले नेमाडेंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू इथे दृष्टीस पडतात. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील जल व भूमी व्यवस्थापन तज्ञ डा. सु. भी. वराडे, ऐतिहासिक दुर्मिळ लेखनाचं जतन आणि संशोधन करणारे चरित्रलेखक डा. नीळकंठ बापट, रायपूरचे ज्ञानपीठ विजेते हिंदी साहित्यिक विनोदकुमार शुक्ल, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, इतिहासकार ब्रह्मानंद देशपांडे, बहुजनांच्या शिक्षणाचे प्रेरणास्थान असलेले सयाजीराव गायकवाड आणि त्यांचे दत्तकपुत्र मा. विनायकराव पाटील, ज्ञानात्म प्रबोधनाचे वेड असलेले ज्येष्ठ पत्रकार, गायक नट आणि नाटककार ज्ञानेश महाराव आदी त्यांना भावलेली अनेक लोभस व्यक्तिमत्त्वे त्यांच्या कार्याचा आढावा घेत बाबा शब्दांतून बोलकी करतात. अतिशय सुटसुटीत आणि सोप्या वर्णनशैलीमुळे वाचकांनाही ती नक्कीच भावतील.

लेखसंग्रहाच्या दुसऱ्या भागात वेरुळ, अजिंठा, खुलताबाद, दौलताबाद, पैठण, आळंदी, बुद्धगया, काशी विश्वनाथ, आग्य्राचा ताजमहाल, त्रिवेणी संगमाचे अलाहाबाद यांच्या भेटीत त्यांच्या मनात जागे होणारे अनोखे भावबंध नितळ, पारदर्शी आणि कल्पनारम्य शैलीत किती हळुवारपणे साकार होतात ते पाहण्यासारखं आहे. अमेरिकेतील पाम्प निमित्ताने वाटाडय़ा तरुण मैत्रिणीशी झालेला मूक संवाद आणि पानडात भेटलेली जपानी मैत्रीण इमीच्या भावस्पर्शी आठवणीही तितक्याच नाजुक आणि कविमनाचा प्रत्यय देणाऱया. केसरीनाथ पाटील यांच्यासह त्यांच्या ट्राव्हल्सबरोबर केलेल्या कश्मीर प्रवासातील आठवणीही अशाच खमंग आणि रोचक. बाबा भांड यांच्या प्रतिभावान लेखणीचं सामर्थ्य त्यांच्या कविमनाचा तरल स्पर्श असलेल्या ललित लेखनातून अधिक जाणवतं. त्यातील भास-आभासाची किमयाही लक्ष वेधून घेणारी. काही लेख छोटेखानी असले तरी त्यातील सहज सौंदर्य मनाला भिडल्याशिवाय राहात नाही.

वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या या लेखांचं नेटकं संपादन व सरदार जाधव यांचं आकर्षक मुखपृष्ठ संग्रहाच्या वाचनप्रियतेत भर घालणारं आहे.

साथसंगत
लेखक : बाबा भांड
ह संपादक : दिनेश पाटील
ह प्रकाशक : साकेत प्रकाशन, संभाजीनगर
ह पृष्ठे : 216 ह मूल्य : रु. 250/-

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.