>> दुष्यंत पाटील
डच लोकांच्या सुवर्णकाळात चित्रकला बहरली. याच काळातील ‘उत्तरेकडची मोनालिसा’ नावाने प्रसिद्ध असणारे चित्रकार म्हणजे योहानीस व्हर्मीर याचे ‘गर्ल विथ अ पर्ल इअररिंग’ (मोत्यांच्या कर्णफुलांसहित असलेली मुलगी) हे चित्र हॉलंडवासीयांसाठी राष्ट्रीय संपत्ती इतकेच मौल्यवान आहे.
सतरावं शतक म्हणजे डच लोकांचा सुवर्णकाळ (Dutch Golden Age) होता. डच व्यापाऱयांनी मसाल्यांचा व्यापार करत या काळात गडगंज संपत्ती जमा केली. डच लोकांची कलाही या काळात बहरली. हे डच व्यापारी त्या काळच्या कलाकार मंडळींचे आश्रयदाते बनले. त्यांना आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायला भिंतीवर छान चित्रं लावायला आवडायचं. या व्यापाऱयांना आपल्या दिवाणखान्यात लावायला साधी, घरगुती विषय असणारी सुंदर चित्रं हवी असायची. दैनंदिन आयुष्यातली दृश्यं दाखवणारी चित्रं त्यांना आवडायची. अशा प्रकारची चित्रं काढण्यासाठी त्या काळात प्रसिद्ध असणारा एक चित्रकार म्हणजे योहानीस व्हर्मीर. व्हर्मीरच्या चित्रात आपल्याला दूध ओतणारी स्त्राr, पत्र वाचणारी मुलगी, डेल्फ्ट शहराचं दृश्य, गिटार वाजवणारी स्त्राr अशी रोजच्या आयुष्यातली दृश्यं दिसतात.
योहानीस व्हर्मीर हा सतराव्या शतकातील डच कलेच्या सुवर्णयुगातला एक महान कलाकार होता. व्हर्मीरला ‘प्रकाशाचा मास्टर’ म्हणून ओळखले जाते, कारण त्यांच्या चित्रातला प्रकाश अगदी नैसर्गिक वाटतो. त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्यानं आयुष्यभरात फक्त 35-40 चित्रं रंगवली. व्हर्मीरचा एक ‘खास गिऱहाईक’ (आश्रयदाता) होता ‘पीटर व्हॅन रुईव्हन’ नावाचा एक श्रीमंत माणूस. हा माणूस व्हर्मीरचा खूप मोठा चाहता होता. व्हर्मीर जे काही काढायचा, ते बहुतेक सगळं हा पीटर विकत घ्यायचा.
व्हर्मीरच्या चित्रांपैकी ‘गर्ल विथ अ पर्ल इअररिंग’ (मोत्यांच्या कर्णफुलांसहित असलेली मुलगी) हे चित्र सर्वात प्रसिद्ध आहे. डच लोकांची भूमी युरोपमध्ये उत्तरेकडे असल्यानं आणि हे चित्र विश्वविख्यात मोनालिसाच्या चित्राच्या तोडीस तोड असल्यानं, हे चित्र ‘उत्तरेकडची मोनालिसा’ नावानंही ओळखलं जातं. असं मानलं जातं की, हे चित्रसुद्धा त्याच्या आश्रयदात्या पीटरनं विकत घेतलं.
या चित्राकडे जरा जवळून पाहूया. या चित्रात बॅकग्राऊंडला (पार्श्वभूमी) फक्त काळाकुट्ट अंधार दाखवलाय. या बॅकग्राऊंडमुळे चित्रामध्ये एक खास परिणाम साधलाय. या चित्रात त्यानं त्या काळात अतिशय महाग असणारा निळा (अल्ट्रामरीन ब्लू) वापरला. त्यानं तो निळा रंग फक्त तिच्या पगडीसाठीच नाही, तर त्या मुलीच्या जॅकेटच्या सावलीमध्ये आणि त्या मोत्यामधल्या रिफ्लेक्शनमध्ये निळ्या रंगाची हलकी छटा देत वापरला. याला ‘कलर हार्मनी’ म्हणतात. संपूर्ण चित्राला एका सूत्रात बांधून ठेवण्याचं हे एक तंत्र आहे.
तिच्या उजव्या गालाचा आणि नाकाचा रंग एकमेकांत असा मिसळलाय, की कुठे गाल संपला आणि नाक सुरू झालं, हे स्पष्टपणे दिसत नाही. लिओनार्दो द विंची (ज्यानं मोनालिसा काढली) या तंत्राला ‘स्फुमॅटो’ म्हणायचा. ‘स्फुमॅटो’ म्हणजे धुरासारखं विरघळणारं. व्हर्मीरनं हेच तंत्र वापरलंय. त्यानं चित्रात कुठेही सुस्पष्ट रेषा (Sharp Lines) दाखवलेल्या नाहीत. यामुळे हे चित्र जास्त वास्तवातलं असल्यासारखं वाटतं.
एखादा सिनेमॅटोग्राफर जसा सिनेमात प्रकाशयोजना करतो, तसंच व्हर्मीरनं इथे केलंय. प्रकाश डावीकडून येतोय. पण तो ‘फ्लॅश’ मारल्यासारखा प्रखर नाहीये. तो खिडकीतून आलेल्या नैसर्गिक प्रकाशासारखा आहे. तिच्या डोळ्यांकडे पाहताना आपल्याला बुबुळांमध्ये एक छोटासा पांढरा ठिपका दिसतो. ओठांच्या खालच्या कोपऱयात एक छोटासा ओलावा दिसतो. याला ‘हायलाईट्स’ म्हणतात. हे दोन-तीन पांढरे ठिपके त्या मुलीला जिवंत करतात. जर हे ठिपके काढले, तर ती पूर्णपणे निर्जीव वाटेल. दर्दी लोक यालाच व्हर्मीरची ‘मास्टरी’ मानतात.
शेवटचा एक तांत्रिक मुद्दा. चित्राची मांडणी कशी आहे बघा. तिचा खांदा आणि डोकं मिळून एक त्रिकोण किंवा पिरॅमिड तयार होतो. टोकाकडे ते निमुळतं होत जातं. ही त्रिकोणी रचना चित्राला स्थिरता देते. ती मुलगी जरी वळून बघत असली, तरी हे चित्र बघताना आपल्याला अस्वस्थ वाटत नाही. कारण त्याचा पाया भक्कम आहे. आपल्या जुन्या वाडय़ांचं किंवा मंदिरांचं बांधकाम कसं भक्कम पायावर असतं, तसंच हे चित्र भक्कम रचनेवर उभं आहे.
1881 मध्ये नगण्य किंमतीला विकलं गेलेलं हे चित्र आज अमूल्य आहे. या चित्राचा जवळपास 15 अब्ज रुपयांचा विमा उतरवला गेलाय. आज हे चित्र हॉलंडवासीयांसाठी राष्ट्रीय संपत्तीच आहे.
[email protected]