Ravindra Chavan-मराठी: शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील वादावर पडदा पडल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) हे एकाच मंचावर आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा (Shrikant Shinde) उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी हस्तांदोलन करत स्वागत केले आहे.
नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीदरम्यान, रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुरुंग लावल्याने नाराजीचं वातावरण होतं. तसेच हे प्रकरण दिल्लीला अमित शाह यांच्या दरबारी देखील पोहचलं होतं. त्यानंतर आता या वादावर पडदा पडल्याचे समोर आलं आहे. (Ravindra Chavan-Shrikant Shinde)
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे हे व्हिजन असलेले खासदार आहेत, असं कौतुक एकनाथ शिंदेंनी यावेळी केलं. ज्यावेळी एखाद्या मतदारसंघाला व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी मिळतो तेव्हा मतदारसंघाचा निश्चितच कायापालट होतो. श्रीकांत शिंदे यांनी कोणतेही काम एकदा हातात घेतले, तर ते तडीस नेईपर्यंत ते त्या कामाचा पाठपुरावा करतात, त्यांच्या यांच गुणामुळे शहरात अनेक विकासकामे करणे शक्य झाले असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
युतीमधील तणावानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या. मात्र रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या मधोमध मंत्री उदय सामंत बसले होते. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या गप्पा पाहता नंतर उदय सामंत बाजूच्या खुर्चीवर बसले आणि रवींद्र चव्हाण यांना त्यांची खुर्ची दिली. यानंतर मंचावर रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे बाजूबाजूला बसून मंचावर गप्पा मारत होते.
या कार्यक्रमादरम्यान एमएमआर रिझनमध्ये सर्वात जास्त निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी एमएमआरमध्ये सर्वात जास्त निधी दिल्याचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात टीका टिपणी करून आज जरी हे बडे नेते एकत्र आले असले तरी आपापल्या पक्षातील मुख्यमंत्र्यांनी निधी दिल्याचा दावा करताना भाजप शिवसेना कुठेही कमी पडले नाहीत.
सदर कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली. माझ्यावर टीका करणारे खूप आले, माझ्या कामात खूप खड्डे खोदले पण हा श्रीकांत शिंदे त्यात पडला नाही. ज्यांनी टीका केली, ज्यांनी खड्डे खोदले त्यांचे काय झाले तुम्हाला पण माहीत आहे, मी टीकेला उत्तर देत नाही, मी कामातून उत्तर देतो, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. यादरम्यान मात्र रवींद्र चव्हाणांचं नाव घ्यायला श्रीकांत शिंदे विसरले होते. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा पोडीयमवर येऊन माफीही मागितली.
आणखी वाचा