वारसावैभव – गोंड राजांच्या स्मृतिशिळा
Marathi December 07, 2025 12:25 PM

>> प्रणव पाटील

ताडोबाच्या जंगलात चक निंबाळा या गावानजिक आहे ‘महागाव रिट’. याचा अर्थ आहे गोंडाचे वस्तीस्थान असणारे महागाव. इथल्या गोंड राजांच्या स्मृतिशिळा आजही त्यांचा वैभवशाली वारसा लेऊन आहेत.

ताडोबाचं जंगल म्हणजे वाघांचं निवासस्थान. या जंगलात कधीकाळी या परिसरावर राज्य केलेल्या गोंड राजांच्या स्मृती शिल्लक आहेत. चंद्रपूरपासून मूलकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावर साधारण 24 किलोमीटरवर डावीकडे चक निंबाळा गावाकडे जाणारा फाटा लागतो. त्या अर्ध्या कच्च्या रस्त्याने जाताना मध्ये चक बोर्डा नावाचं गाव लागतं. आजूबाजूला बाबूंच्या तट्टय़ा लावून अंगण केलेली गोंड आदिवासींची घरी दिसतात. नुकताच शेतातला भात कापून झाल्यामुळं त्या शेतात गायी चरताना दिसत होत्या. अनेक ठिकाणी शेतांनाही बाबूंच्या तट्टय़ांचं कुंपण असल्याचं दिसत होतं. या रस्त्यावर साधारण तीन-एक किलोमीटरवर चक निंबाळा गाव लागतं. या गावाच्या मधून गेलेल्या ओढय़ावरचा पूल ओलांडून पुढे गेलं की, ताडोबाच्या जंगलाची घनदाट झाडी दिसायला लागतात. एकीकडे शेती आणि दुसरीकडे ताडोबाच्या घनदाट झाडांची नैसर्गिक भिंत. या दोन्हींच्या मधून सीमा रेखणारा लहानसा डांबरी रस्ता जातो. या रस्त्याच्या कडेला लहान लहान मचाण उभारून माकडांपासून शेताची राखण करायला बसलेली गावकरी मंडळी दिसत होती.

अशाच एक मचाणावर बसून राखण करत असलेले परशुराम आत्राम नावाचे आजोबा भेटले. कापसाची कोवळी बोंडं माकडं खातात म्हणून त्यांची शेत राखण चालू होती. त्यांना गोंड राजांच्या स्मृतिशिळा कुठे आहेत असं विचारताच त्यांनी जंगलाकडे बोट दाखवलं. ताडोबाच्या जंगलात अंधारी नदीच्या कडेला महागाव रिट म्हणून ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. जंगलात ते ठिकाण आम्हाला सापडणार नाही म्हणून त्यांनी रस्ता दाखवायला बरोबर यायचं ठरवलं.

मुख्य रस्त्यापासून जंगलात साधारण एक किलोमीटर अंतर आम्ही चालून गेलो. मध्ये कोरडा पडलेला पावसाळ्यात प्रवाहित होणारा एक ओढा लागला. जंगलात सागाच्या झाडांचीच संख्या जास्त होती. त्या गर्द जंगलातून पुढे एका मोकळ्या जागी आम्ही आलो. लांबवरून गोंड राजांच्या स्मृती दर्शवणाऱया शिळा नजरेला पडत होत्या. त्या ठिकाणी लावलेल्या एका फलकावर ‘महागड पेन ठाणा’ असं लिहिलेलं होतं. गोंडी भाषेत ‘पेन’ म्हणजे देव. ठाणा म्हणजे त्याचं ठिकाण. या ठिकाणाला ‘महागाव रिट’ असंही म्हणतात. यातल्या ‘रिट’चा अर्थ म्हणजे वसाहत. याचाच अर्थ महागड अथवा महागाव या ठिकाणी गोंडांचं वसतिस्थान होतं. त्या मोकळ्या जागेपासून खाली अंधारी नदी वाहत होती. या नदीकडे तोंडकरून तब्बल सहा फुटांपासून ते दीड-दोन फूट उंचीच्या स्मृतिशिळा उभ्या होत्या. त्यांची संख्या किमान दीडशे असावी असं वाटत होतं.
या स्मृतिशिळांमध्ये सर्वात पुढे मध्यभागी असणारी उंच स्मृतिशिळा एका गोंड राजाची होती. या शिळेवर सर्वांत वर मंदिराच्या त्रिकोणी कळसाच्या आकाराची रचना होती. त्याच्या चारही बाजूनं लहान मनोरे वाटावे अशी रचना होती. अखंड शिळेवरचं जणू ते स्मृतिमंदिरच कोरलं होतं. त्याच्या खाली असणाऱया मुख्य भागावर हत्तीवर हौद्यात बसलेला राजा आणि त्याच्या पुढेमागे माहूत आणि मोर्चेल घेतलेला सेवक दाखवला होता. याशिवाय खाली हत्तीच्या पुढे झेंडा घेतलेला एक जण आणि मागे अब्दागिरी घेतलेला आणखी एक सेवक होता. या कप्प्याच्या खाली दोन ओळींमध्ये दाखवलेल्या स्त्रियांच्या हातात कमळ, चवरी अशी प्रतीकं असल्याचं दिसत होतं. या शिळेवर अनेक ठिकाणी शेंदूर लावल्यामुळे त्यांचं सौष्ठव बिघडलं होतं. तीही त्या उंच स्मृतिशिळेच्या दोन्ही बाजूंनी कोरीवकाम केल्याचं दिसत होतं. उरलेल्या स्मृतिशिळांवर घोडय़ावर बसलेला वीर आणि दोन किंवा तीन स्त्रिया दिसत होत्या. काही स्मृतिशिळांवर नावं कोरल्याचं दिसत होतं. त्यातल्या एका शिळेवर देवनागरी लिपीत गोंडराजा असं कोरल्याचं मात्र वाचता आलं.

या गोंड राजांच्या स्मृतीस्वरूप उभारलेल्या शिळांची माहिती आत्राम आजोबा जे स्वत गोंड होते, ते सांगू लागले ती अशी, या ठिकाणी आमचे पूर्वज सांगतात की गोंडांची राजधानी होती. या ठिकाणी तिजच्या महिन्यात देव निघतात. त्यावेळी झाडावर मडक्यात बांधून ठवलेले देव काढले जातात आणि सगळं गाव इथे तीन दिवस येऊन राहतं. लांबून लांबून गोंड आदिवासी येतात. या शिळांची पूजा करतात. त्यावेळी कोंबडीचा बळी दिला जातो. यातल्या मुख्य शिळा या गोंड राजांच्या आहेत तर काही त्यांच्या सैनिकांच्या आहेत. पूर्वी इथे वस्ती होती, अशी माहिती देत असतानाच आत्राम आजोबांनी इथून लवकर निघायला पाहिजे असं सांगितलं. या भागात वाघाचा संचार असल्यामुळे संध्याकाळच्या आधी सगळे गावाकडे परतत होते. जंगलात ठिकठिकाणी झाडांच्या बुंध्यांना वन विभागाने जंगली प्राण्याच्या ट्रकिंगसाठी लावलेले कॅमेरे दिसत होते. ताडोबाच्या जंगलात गोंडांच्या इतिहासाच्या त्या पाऊलखुणा पाहून आम्ही पुन्हा जंगलाच्या बाहेर आलो, त्यावेळी इतिहासकाळातून आजच्या काळात आल्याचा भास झाला.
[email protected]

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.