
>> रविप्रकाश कुलकर्णी
वाडा संस्कृती ही महाराष्ट्राची एकेकाळी ओळख होती. काळाच्या ओघात ती विरत गेली. अर्थात त्याबरोबर त्याचा इतिहासदेखील. अशा हरवलेल्या इतिहासाचा शोध सुमित डेंगळे घेत गेले. त्या अभ्यासातूनच आकारास आलेला ग्रंथ `ऐतिहासिक वाडे व घराणी’ जो सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेला आहे.
उत्तर अहिल्यानगर जिह्यातील मराठे शाहीच्या काळातील अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध वाडे आणि त्यात वास्तव्य करणाऱया ऐतिहासिक घराण्यांचा अभ्यास करून सुमित डेंगळे यांनी ग्रंथसिद्धी केली आहे. छत्रपती शिवरायांचे सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांच्यापासून ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांच्यापर्यंतचा इतिहास धांडोळा येथे घेतलेला आहे.
लेखकाने त्या मागच्या गोष्टी सांगून, जो इतिहास सांगितला आहे त्याने वाचकांचे कुतूहल नक्कीच वाढते. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर असलेले परमानंद यांनी शिवभारत हा ग्रंथ लिहिला. ज्यामुळे महाराजांच्या जन्मतारखेचा गोंधळ मिटला. अशा चरित्रकाराची गढी नेवासे येथून 22 किलोमीटरवर खेडले परमानंद येथे आहे. त्याचबरोबर शिवभारत ग्रंथ कसा उपलब्ध झाला. ती कहाणी अनेक गोष्टीवर प्रकाश टाकते. 1920 च्या दशकात या ग्रंथाची प्रत तंजावरच्या सरस्वती महालात इतिहास संशोधक स. म. दिवेकर यांना सापडली. ती तामीळमधली होती. म्हणून दिवेकर यांनी त्याचा मराठी अनुवाद सुरू केला. पण तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, हा ग्रंथ मूळ संस्कृत ग्रंथाचा अनुवाद आहे. म्हणून मग ते संस्कृत प्रतीच्या शोधात राहिले. सुदैवाने या ग्रंथालयात मूळ संस्कृत प्रत सापडली! 1927 मध्ये दिवेकर यांनी संपादन करून मूळ संस्कृत ग्रंथ आणि त्याचा मराठी अनुवाद प्रकाशित केला. मात्र परमानंदानी दिलेले नाव अनुपुराण सूर्यवंश बदलून त्यांनी तामीळ आवृत्तीत दिलेले नाव, जे विषयाला थेट भिडते ते शिव भारत असे दिले.
मराठय़ांच्या इतिहासातील दुर्लक्षित व्यक्तिमत्व म्हणजे त्रिंबकजी डेंगळे. त्यांचा वाडा निमगाव जाळी येथे आहे. तो सगळा इतिहास सांगून लेखक म्हणतो, त्रिंबकजी डेंगळे हे मराठी माणसापर्यंत पोहोचले, ते ना.सं. इनामदार यांच्या `झेप’ कादंबरीमुळे. वाघावरून ज्ञानेश्वराला भेटायला आलेल्या चांगदेवाचे मंदिर पुणतांबे येथे आहे. पुणतांबे येथे लुंपाटकी यांचा वाडा प्रसिद्ध आहे. हे अपरिचित असे नाव कसे पडले? त्याबाबत लेखक माहिती देतो वेदशास्त्र संपन्न बाळकृष्ण यांनी काशीत `लुंप’ नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांचे पुत्र शंकर यांनी तो पूर्णत्वास नेला. त्यामुळे त्या घराण्याला `लुंपाटकी’ आडनाव प्राप्त झाले.
अशाप्रकारे वेगवेगळ्या वाडय़ासंबंधात ऐतिहासिक माहिती आणि त्याला जोडून पूरक माहिती दिल्यामुळे वाचकाच्या मनात त्या वाडय़ांबद्दल कुतूहल निर्माण होते.








