डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी श्रद्धांजली
बदोही ते मुंबई गोविंद यादव यांची सायकल यात्रा
ठाणे, ता. ६ (बातमीदार) : भीम अनुयायी गोविंद यादव यांनी उत्तर प्रदेशातील बदोही जिल्ह्यातून महाराष्ट्रातील मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीपर्यंत सायकल यात्रा करून आगळी-वेगळी श्रद्धांजली दिली आहे. ही यात्रा एक हजार ५५० किलोमीटर लांबीची असून गोविंद यादव यांनी प्रत्येक शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पर्यावरण जपण्याबाबत जनजागृती केली.
गोविंद यादव शुक्रवारी (ता. ५) ठाण्यात दाखल झालेल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांच्या या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक करत आगामी प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रामचंद्र यादव, शरद यादव, विष्णूशंकर तिवारी, विश्वास वानखडे, रामप्रकाश निषाद, जितेंद्र यादव, पप्पू श्रीवास्तव, कृष्णा यादव, काँग्रेसचे मेहरोल, रामआधार शहाणी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे गोविंद यादव यांनी शनिवारी (ता. ६) आदरांजली वाहिली आणि यात्रेचा समारोप केला. गोविंद यादव यांच्या या सायकल यात्रेने आदरांजलीसोबतच सामाजिक जागरूकतेचा संदेशही दिला असून, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक योगदानाच्या दिशेने लोकांना प्रेरणा दिली आहे.