मनोरुग्णालयातील ७२४ वृक्षांवर गदा
तोडण्याचा प्रस्ताव ठाणे पालिकेकडे सादर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीविरोधात रान पेटलेले असताना दुसरीकडे ठाण्यातील प्रदेश मनोरुग्णालयाच्या आवारातील ७२४ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. नवीन इमारतींच्या बांधकामात हे वृक्ष आड येत असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी या वृक्षतोडीची गरज आणि पुनर्रोपण प्रत्यक्षात किती होईल, याबाबत पर्यावरणप्रेमींकडून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे या परिसरातील हिरवाई धोक्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील एक हजार ६१४ वृक्षांपैकी ७२४ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावात ३०३ वृक्ष थेट तोडण्याची, तर उर्वरित ४२१ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची नोंद आहे. पुनर्रोपणाचे ठिकाण, देखभाल आणि जगण्याचे प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नसल्याने पुनर्रोपण हा पर्याय केवळ कागदपुरता राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
देशी वृक्षप्रजाती
मनोरुग्णालय परिसरात फणस, उंबर, बदाम, कडुनिंब, चाफा, बकुळ, अशोका, आंबा, करंज, गुलमोहर, बहावा यांसारख्या अनेक देशी वृक्ष प्रजाती मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचे जतन महत्त्वाचे मानले जाते.
ढोकाळी-कोलशेतमध्येही वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा पेटला
दुसरीकडे ढोकाळी-कोलशेत परिसरातही वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. येथे एका विकसकाने १९३ वृक्षांसाठी नव्या तोडीची परवानगी मागितली असून, यापूर्वीही त्याच विकसकाने सुमारे ४५० वृक्षांची कत्तल केल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. नव्या प्रस्तावात ९८ वृक्षांची तोड आणि ९५ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा दावा करण्यात आला आहे.
नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या
या दोन्ही प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी ठाणे महापालिका आगामी बैठकीत चर्चा करणार असून, वृक्ष प्राधिकरण विभागाने जाहीर सूचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. शहरातील मोठ्या विकासकामांमुळे झपाट्याने कमी होत चाललेल्या वृक्षसंपदेबद्दल ठाणेकरांत चिंता व्यक्त होत असून, हिरवाईचे संरक्षण करण्यासाठी अधिक कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी वाढत आहे.