Agricultural News : द्राक्षशेतीचे भवितव्य धोक्यात! जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कृषी विभागाने व्यापक मोहीम राबवावी
esakal December 07, 2025 01:45 PM

नाशिक: नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागा आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करीत आहेत. नवीन तंत्रज्ञान, प्रगत व्हरायटी आणि बदलते हवामान या तिन्हींच्या संगमामुळे द्राक्षशेतीचा चेहरामोहरा बदलत आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेचा पाया असलेल्या जमिनीच्या पोतातील सातत्य आणि गुणवत्ता हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. शेतकरी आणि कृषितज्ज्ञ यांचा ठाम आग्रह आहे, की बदलत्या कृषी पद्धतींमध्ये जमिनीच्या घटकांचा अभ्यास करून त्यावर दीर्घकालीन, शाश्वत उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे.

‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या ‘व्यथा द्राक्षपंढरीच्या’ या वृत्तमालिकेतून द्राक्षशेतीशी निगडित अनेक मूलभूत समस्यांचा वेध घेतला. एकट्या द्राक्ष या पिकाभोवती तयार झालेला व्यवसाय, रोजगार, निर्यात चक्र आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांची व्यथा समोर आली.

या मालिकेतून शेतकऱ्यांकडून एकच सूर उमटला आहे तो म्हणजे, ‘जमिनीचा पोत सुधारल्याशिवाय द्राक्षशेतीचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही.’ त्यामुळे कमी खर्चात, परिणामकारक आणि वैज्ञानिक पद्धतींवर आधारित जमिनीच्या पोतातील सुधारणा करण्यासाठी कृषी विभागाने व्यापक मोहीम राबवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आता जोर पकडत आहे. द्राक्षबागांचा सातत्यपूर्ण विकास साधायचा असेल तर जमिनीतील शारीरिक, रासायनिक आणि सूक्ष्मजीव घटकांचा अभ्यास करून योग्य ते बदल करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

कृषितज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार...

जमिनीतील सेंद्रिय कर्ब (ऑर्गॅनिक कार्बन) वेगाने कमी होत आहे. अनेक बागांमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त आढळते, जे पोषणद्रव्यांच्या उपलब्धतेवर परिणाम करते. टीडीएस (एकूण विरघळलेले क्षार) वाढल्याने जमिनीची क्षारता वाढते. काही ठिकाणी जमीन पाणी जास्त काळ धरून ठेवते, ज्यामुळे मुळांवर दाब येतो आणि वाढ खुंटते. ही सर्व आव्हाने द्राक्षबागांच्या उत्पादनक्षमतेवर थेट परिणाम करणारी असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोनातून जमिनीतील सुधारणा करणे अपरिहार्य बनले आहे.

आवश्यक उपाययोजना

सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविणे.

कंपोस्ट, गांडूळखत, सेंद्रिय मळण, ग्लायकोप्रोटिन्स यांचा जमिनीवर नियमित वापर.

सेंद्रिय पदार्थांमुळे जमीन हलकी, भुसभुशीत व स्फूर्तिदायक बनते.

जमिनीतील सूक्ष्मजीववर्ग वाढून पोषणद्रव्यांची उपलब्धता सुधारते.

वैज्ञानिक निचरा प्रणालीची (ड्रेनेज सिस्टिम उभारणी.

द्राक्षबागांना पाण्याचा योग्य निचरा नसल्यास मुळांमध्ये पाणी ठाण मांडते. परिणामी, मुळे सडणे, वाइनचे उत्पादन कमी होणे यांसारखे प्रश्न निर्माण होतात. शेतात उपनिचरा नळ्या, खंदक पद्धत, बेड पद्धत यांसारख्या उपायांनी पाण्याचा प्रवाह नियमित करणे गरजेचे.

जमिनीची नियमित तपासणी.

प्रत्येक दोन वर्षांनी माती परीक्षण करणे.

चुनखडीचे प्रमाण, पीएच, क्षारता, पोषणद्रव्यांची उपलब्धता जाणून घेणे.

अहवालाच्या आधारे खत व्यवस्थापन करणे.

कमी खर्चिक पण प्रभावी तंत्रज्ञानाचा प्रसार.

जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या वाणासाठी आवश्यक माती-घटकांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे.

कृषी विभागातर्फे मार्गदर्शन शिबिरे, प्रात्यक्षिके आयोजित करणे.

निचरा चांगला झाल्यास मुळांची कार्यक्षमता वाढून उत्पादनात वाढ होईल. तसेच, व्हरायटी, जमिनीच्या प्रकारानुसार बेंगलोर डॉगरीज, पोलसन, रामसे यांसारखे रूटस्टोक वापरणेदेखील काळाची गरज आहे. या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना तांत्रिक मार्गदर्शनाचीदेखील आवश्यकता आता भासत आहे. येत्या काळात मृदासंवर्धन, तसेच द्राक्षबागेत अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर संशोधन होणे आवश्यक आहे.

- प्रा. तुषार उगले, वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक

द्राक्ष उत्पादक भागातील शेतीचा विचार करता जवळपास सुमारे ५० वर्षांपासून आलटूनपालटून द्राक्ष हेच पीक घेतले गेले आहे. या सततच्या उत्पादनामुळे जमिनीतून ठरावीक नत्र व इतर घटक कमी होऊन गेले. त्याचे पुनर्भरण केले जात नाही. त्यासाठी सर्वंकष मृदा आरोग्य संवर्धनाचा कृती आराखडा शासनाच्या कृषी विभागाने तयार केला पाहिजे.

- संतोष कातकाडे, द्राक्ष उत्पादक, शिवडी (ता. निफाड)

दोन मुलांचा गळा दाबून खून; मुलं विहिरीत बुडाली नाहीत म्हणून मानेवर पाय देऊन दाबलं, वडिलांसह सावत्र आईला जन्मठेप

अनेक प्रकारची कीटकनाशके, बुरशीनाशके, अॅसिडची आळवणी होत असल्याने गांडुळांच्या संख्येवर परिणाम दिसत आहे. त्यामुळे मृदा तयार होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शेतातील अवशेष शेतात कुजविण्याची प्रक्रिया करण्यात यावी. आम्ही तणनाशकाचा वापर बंद केला आहे.

-गोकुळ कानडे, द्राक्ष उत्पादक, पांढुर्ली (ता. नाशिक)

द्राक्षशेतीमध्ये किंवा इतर कोणत्याही पीकपद्धतीमध्ये शेणखताचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. रासायनिक खतामुळे शेतीचा पोत खराब होत असल्याने शेतकरी आता पारंपरिक खत म्हणून बघितल्या जाणाऱ्या शेणखताकडे वळला असून, त्याचे दीर्घकालीन फायदे आहेत.

- रामकिसन मोरे, दुग्धव्यावसायिक, कोठुरे (ता. निफाड)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.