वाणगाव, ता. ६ (बातमीदार) : कृषी विज्ञान केंद्राचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून ‘चला जमिनीचे आरोग्य तपासूया’ ही मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केले आहे.
जागतिक मृदादिनाचे औचित्य साधून कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदादिन शुक्रवारी (ता. ५) साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्यपत्रिकेचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालघर जिल्ह्याचे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा), प्रकल्प संचालक विनायक पवार होते, तर प्रमुख पाहुणे तालुका कृषी अधिकारी अनिल नलगुरवार, कृषी यज्ञेश भूषण सावे, जव्हार महाविद्यालयाचे प्रा. अनंत आवळे, निरंजन घुले, कीटकशास्त्रज्ञ डॉ. उत्तम सहाणे, शास्त्रज्ञ अशोक भोईर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विनायक पवार यांनी समृद्ध शहरी भागासाठी समृद्ध जमीन याविषयी माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी माती परिक्षण, माती संवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. मातीची सुपीकता वाढविण्यासाठी नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन करून शाश्वत शेतीसाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपली जमीन अधिक सुपीक बनविण्याचे आवाहन केले.
अनिल नलगूरवार यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची उपस्थितांना माहिती दिली. प्रा. डॉ. अनंत आवळे यांनी आदिवासी भागातील शेतकरी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असून उत्पादन चांगले घेत आहेत, असे सांगितले.