छत्रपती संभाजीनगर : बोगस आयएएस कल्पना भागवत प्रकरणात सिडको पोलिसांनी चौथा संशयित दत्तात्रय पांडुरंग शेटे (वय ३८, रा. श्रीगोंदा, अहिल्यानगर) याला अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक केली. दरम्यान, शनिवारी (ता. ६) न्यायालयात हजर केल्यानंतर कल्पनाची रवानगी न्यायालयीन कोठडीत, तर शेटेला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शेटेने पाठवले सात लाख रुपयेशेटे हा रियल इस्टेटचे काम करतो. २०२१ मध्ये एका खासगी कार्यक्रमात कल्पनासोबत त्याची ओळख झाली. तपासणीदरम्यान शेटेने कल्पनाला सात लाख रुपये पाठविले. त्यानंतर कल्पनाने शेटेच्या खात्यावर दीड लाख रुपये परत पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वरिष्ठ लिपिक होती. तिची चांगली नोकरी सुरू असताना शेटेशी ओळख झाली. यात शेटेने काय नोकरी करता?, आपण लोकांची कामे करू, यात बदलीसह इतर कामांचा उल्लेख केला. एकच काम केले तर आपल्याला दहा लाखांपेक्षा मोठी रक्कम मिळेल. अशी अनेक कामे आपल्याकडे येतील, असे तिला सांगितले होते. हे ऐकून कल्पनाने ही नोकरी सोडली.
दरम्यान याप्रकरणात कल्पनाची आयबी, एटीएसनेही चौकशी केलेली आहे. मनोज लोढा तसेच शेटेचे नाव समोर आले. दरम्यान, शेटेने कल्पनाची ओळख मनोज लोढा याच्याशी करून दिली. यावरून पोलिसांनी शुक्रवारी शेटेला श्रीगोंदा येथून ताब्यात घेतले.
तपास गोंधळलेलातेरा दिवसांपासून कल्पना कोठडीत असूनही पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. सर्व आर्थिक व्यवहार थेट खात्यांवर झाले. कल्पनाचा देशविघातक कृत्याशी संबंध असल्याचेदेखील आजवरच्या तपासात समोर आलेले नाही. एकंदरीत, हा तपास गोंधळलेला असल्याची बाजू कल्पनाचे वकील ॲड. अभयसिंह भोसले यांनी मांडली. त्यांना ॲड. प्रमोद चव्हाण यांनी सहकार्य केले.
शेटे लुंगीवर न्यायालयात!संशयित शेटे हा लुंगीवर न्यायालयात आला. यामुळे एक वरिष्ठ पोलिस अधिकारी भडकले. त्यावर कर्मचाऱ्याने तेथील पार्किंग चालकाची दुचाकी घेऊन जात जवळील एका दुकानातून शेटेसाठी चक्क पॅंट आणली. कर्मचारी ही पॅंट घेऊन न्यायालयात आला. तेथे शेटेने ही पॅंट घातल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. याची दिवसभर चर्चा झाली.
Fake IAS Kalpana Case: ‘इमोशनल ब्लॅकमेल’मध्ये कल्पना माहीर! आणखी एक कारनामा, खासदारांसह शहरातील अनेकांना गंडाया गोष्टीही आल्या समोर
शेटे मोठ्या नेत्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन बदल्यांची कामे करायचा.
हरजाई होमगार्ड, एका केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीचाही नंबर असल्याचा त्याचा दावा.
कल्पना एका बाबाची भक्त, या बाबाकडून नेतेही सल्ले घेतात.
बाबांवर श्रद्धा असल्याने कल्पना अविवाहित.
शेटेवर नुकतीच शस्त्रक्रिया झालेली असून, त्याच्या हातावर सलाइनची पट्टीही दिसली.