Sawantwadi Girl Death : हृदय पिळवटणारी घटना! पहाटे दार उघडलं अन् वडिलांनी पाहिलं धक्कादायक दृश्य; बारावीत शिकणाऱ्या मयुरीनं...
esakal December 07, 2025 05:45 PM

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नेतर्डे खोलबागवाडी येथील १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी मयुरी आनंद परब हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Sawantwadi Girl Death) केली.

गोव्यात बारावीचे शिक्षण घेत असलेली मयुरी जत्रा पाहून शुक्रवारी रात्री कुटुंबीयांसोबत घरी परतली होती. रात्री साधारण ९.३० वाजता ती वडिलांसोबत घरी आली. जेवण आटोपून सर्वजण झोपले; मात्र पहाटे जेव्हा वडील तिच्या खोलीत गेले, तेव्हा समोर दिसलेलं दृश्य धक्कादायक होतं. मयुरीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला होता.

Miraj Accident : दिराच्या लग्नाची तयारी राहिली अधुरीच! भरधाव डंपरने महिलेला चिरडले; मुलगी पाहण्यासाठी जाताना...

कुटुंबीयांनी तातडीने तिला कासारवर्णे (गोवा) येथील रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची आकस्मिक मृत्यूची नोंद बांदा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबर रोजी मयुरी कुटुंबीयांसोबत बांदा येथे श्रीबांदेश्वर जत्रेसाठी आली होती. घरी परतल्यानंतर कोणतीही विशेष तणावपूर्ण घटना घडल्याचं समोर आलेले नाही. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, कर्मचारी सिद्धार्थ माळकर, टी. टी. कोळेकर आणि संगीता बुर्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी केले. मयुरीच्या मागे आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. तिच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिस तपास सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.