New Marathi Book : सायबर गुन्हेगारी व संरक्षणाचा सर्वांगीण वेध
esakal December 07, 2025 05:45 PM

अनिल सावळे - anil.sawale@esakal.com

डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रसार जगभरात झाल्याने आता बँकिंग ते खरेदीपर्यंत सर्व काही ऑनलाइन होत आहे. यामुळे जेवढा सोपेपणा वाढला, तेवढी सायबर गुन्हेगारीही वाढली. सायबर गुन्हेगार नवनव्या कल्पना राबवून सर्वसामान्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. अशा स्थितीत सीए शिरीष देशपांडे यांचे ‘सायबर गुन्हेगारी आणि स्व-संरक्षण’ हे पुस्तक नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

पुस्तकात सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती, ऑनलाइन फसवणूक, हॅकिंग, बँकफसवणूक यांसारख्या प्रकरणांचा सोदाहरण उल्लेख आहे. तांत्रिक बाबी साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नवशिक्या वापरकर्त्यांनाही सहज समजेल अशा स्वरूपात त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. पुस्तकातून वाचकाला सायबर सुरक्षेचे ज्ञान, खबरदारी आणि इंटरनेटवर सुरक्षित कसे राहावे, याची माहिती मिळते. यशोधरा देशपांडे यांनी तयार केलेले आकर्षक व विषयासाठी समर्पक ठरणारे मुखपृष्ठ वाचकांचे लक्ष वेधून घेते. प्रस्तावना ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’चे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी लिहिली आहे.

केंद्र सरकारने नागरिकांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. जसे की, ‘नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल’ सुरू केले आहे. त्यावर नागरिक सायबर गुन्हे ऑनलाइन नोंदवू शकतात. पोर्टलवर नोंदवलेल्या गुन्ह्यांचे ‘एफआयआर’मध्ये रूपांतर करण्यासह पुढील तपासाची जबाबदारी पोलिस खात्यावर सोपवण्यात आली आहे. ‘इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर’ आणि विशेष प्रशिक्षित सायबर तंत्रज्ञानविषयक उपक्रमही राबविण्यात आले आहेत अशा विविध बाबींची माहिती पुस्तकातून मिळते.

Paithan Crime : DMIC बिडकीन परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत ३ पुरुष अटकेत; ३ महिला फरार; १.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त!

सायबर गुन्हेगारीमुळे संबंधित व्यक्ती, कुटुंबीयांना आर्थिक आणि मानसिक पातळीवर धक्का बसतो. उदाहरणार्थ, मृत व्यक्तींच्या अधिकृत आधार, पॅनकार्डचा गैरवापर करून व्यवहार केले जातात. परदेशस्थित भारतीयांना देशाबाहेरून ‘डिपोर्ट’ची भीती दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे. या प्रकारच्या घटना समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. संशयास्पद ईमेल, मेसेज किंवा लिंकवर क्लिक करताना नेहमी जाणीव ठेवावी आणि आपली व्यक्तिगत माहिती कधीही अविश्वासू व्यक्तीला देऊ नये. शास्त्रशुद्ध खबरदारी, चौकस इंटरनेट वापर आणि ‘सतर्कता हीच सुरक्षा’ या तत्त्वांचे पालन करणे हेच धोके टाळण्याचे प्रभावी उपाय आहेत.

महिलांचा ऑनलाइन छळ, मुलांच्या इंटरनेट वापरावर नियंत्रण, युवा पिढीतील ऑनलाइन गेम व सोशल मीडियाचे व्यसन, ज्येष्ठ नागरिकांची डिजिटल फसवणूक, ऑनलाइन प्रतिष्ठा आणि मानहानी, ‘फेक न्यूज’चे दुष्परिणाम, २-फॅक्टर ऑथेंटिकेशन, सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग्ज, अज्ञात लिंक, कॉल्स, ॲप्सपासून सावधगिरी, ऑनलाइन फसवणूक ओळखण्याचे सोपे मार्ग असे विविध विषय त्यांनी वास्तवातील उदाहरणांच्या आधारे मांडले आहेत.

लेखक सीए शिरीष देशपांडे हे अनुभवी सायबर सुरक्षातज्ज्ञ आहेत. ते अनेक संस्थांमध्ये प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचे कार्य करतात. देशपांडे यांनी सायबर गुन्हेगारीबाबत साध्या भाषेत लेखन केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना गुन्ह्याचे स्वरूप समजण्यास आणि त्यापासून बचाव करण्यास मदत होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे लोकांमध्ये सायबर जागरूकतेचा प्रसार होतो. त्यांनी या पुस्तकातून आधुनिक डिजिटल युगातील सायबर धोक्यांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे? याचे व्यवहार्य मार्गदर्शन केले आहे. ‘जागरूकता हीच सर्वोत्तम सुरक्षा’ हा संदेश लेखक प्रभावीपणे पोहोचवतात.

सायबर गुन्हेगारी हे आजचे वास्तव आहे. डिजिटल युगात सुरक्षितता ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी ठरते. त्या दिशेने जागरूकता निर्माण करण्यात आणि गुंतागुंतीचा विषय साध्या भाषेत समजावून सांगण्यात हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावते. आधुनिक गुन्हेगारीचे स्वरूप समजून घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या आणि डिजिटल जगात सुरक्षिततेने वावरू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने ते आवर्जून वाचावे!

  • पुस्तकाचे नाव : सायबर गुन्हेगारी आणि स्व-संरक्षण

  • लेखकाचे नाव : सीए शिरीष देशपांडे

  • प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स, पुणे

  • पृष्ठे : २३६ मूल्य : ३०० रु.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.