Smriti Mandhana Marriage : गेल्या अनेक दिवसांपासून भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्या लग्नाची चर्चा चालू आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता पलाश मुच्छल याच्यासोबत तिचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले. आता मात्र हे लग्न थेट रद्द करण्यात आले आहे. तशी माहिती स्मृती मानधनाने दिली आहे. पलाशने एका मुलीसोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट पुढे आल्यानंतर स्मृतीने हा निर्णय घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, स्मृती मानधनाने पलाशसोबतचे लग्न रद्द केलेले असले तरी पलाशसाठी तिने सर्वांकडे एक विनंती केली आहे. तिच्या याच विनंतीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
स्मृती मानधानाने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर स्टोरीच्या माध्यमातून पलाशसोबतच्या लग्नावर भाष्य केले आहे. आता हे लग्न रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती तिने दिली आहे. सोबतच आता आयुष्यात पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे मतही स्मृती मानधनाने व्यक्त केले आहे. लग्न रद्द झालेले असले तरीही मी क्रिकेट खेळणं सोडलेलं नाही, असंही तिने स्पष्ट केलंय. भारतासाठी मला आणखी ट्रॉफी आणायच्या आहेत, असे ती म्हणाली आहे. विशेष म्हणजे पलाशसोबतचे लग्न मोडलेले असले तरीही तिने पलाशच्या कुटुंबीयांचीही काळजी घेतली आहे.
मला आता माझ्या लग्नाचे प्रकरण संपवायचे आहे. तुम्हीदेखील हा विषय संपवावा, असे आवाहन तिने आपल्या चाहत्यांना केले आहे. यासह तिने पालशच्या आणि स्वत:च्या कुटंबाविषयीही भाष्य केले आहे. आमच्या दोन्ही कुटुंबाच्या खासगीपणाचा सर्वांनीच आदर करावा, असे म्हणत तिने दोन्ही कुटुंबांविषयीची चिंता व्यक्त केली आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी आमची प्रायव्हसी जपा असे आवाहन तिने केले आहे. काही दिवस स्मृती मानधनाचे लग्नाचे प्रकरण मागे पडले होते. आता ते नव्याने चर्चेत आले असून यात पुढे नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.