उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन चांगलंच वादळी ठरू शकतं. राज्यातील विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. सध्या शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नाला एकनाथ शिंदे यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे. अशी चर्चा सुरू आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलत नाही, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी अबोला धरला आहे, असा प्रश्न यावेळी एकनाथ शिंदे यांना करण्यात आला होता.
नेमकं काय म्हणाले शिंदे?
या प्रश्नाला एकनाथ शिंदे यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे. आता आम्ही काय करतो, रोज एकमेकांना फोन करतोना त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो. नाहीतर रोज मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो आता इन्स्टाग्रामवर टाकतो. नाहीतर आता आपण हस्यजत्रेला जावू यात असं त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून म्हटलं आहे. दरम्यान सध्या विरोधकांकडून विरोधी पक्षनेतेपदाची मगणी जोर धरत आहे, यावर बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
लोकांचे प्रश्न मांडा हीच विरोधकांना विनंती आहे, विरोधी पक्षनेतेपद नसेल तर उपमुख्यमंत्रिपद रद्द करा बोलतात. तुमच्या काळात उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य होतं का? असा थेट सवालच एकाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे. सारखं जळजळ आणि मळमळ नको. लोकांचे प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेतेपदावर सवाल करत आहेत, आधी संख्या कमवा आणि मग विरोधी पक्षनेतेपद मागा. विरोधी पक्ष संख्येनं कमी असला तरी त्यांना आम्ही गांभीर्यानं घेऊ, विरोधक सभागृहाबाहेर आंदोलन करण्यात आनंद मानतात. पायऱ्यांवरच स्टट करण्यात धन्यता मानतात, असं टीका यावेळी शिंदे यांनी केली आहे.