Winter Session: तोट्यातील महामंडळाचे आर्थिक विघ्न संपेना! मोक्याची जागा गेली, मोबदलाही रखडला, प्रवासी सुविधा, विकासकामांवर परिणाम
esakal December 08, 2025 06:45 AM

अखिलेश गणवीर

नागपूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ची शहरातील अतिशय मोक्याची जागा मेट्रो प्रकल्पात गेली. सात वर्षे होऊनही त्याचा मोबदला मिळाला नाही. महामंडळ तोट्यात असल्याची ओरड नेहमीचीच आहे. आर्थिक कचाट्यात सापडलेल्या महामंडळाचे विघ्न संपत नसल्याने प्रवासी सुविधा आणि विकासकामांवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

विभाग नियंत्रकांच्या माध्यमातून महामंडळाचा कारभार प्रत्येक विभागात चालतो. शहरातील रेल्वे स्थानकाजवळील एमपी बस स्टॅण्डच्या बाजूला एसटीच्या विभाग नियंत्रकांचे कार्यालय होते. जवळपास ५० वर्षांपासून एसटीच्या नागपूर विभागाचा संपूर्ण कारभार येथून चालायचा.

ही जागा ४, ७६३ चौरस मीटरची होती. अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेले हे कार्यालय गणेशपेठ स्थानकाच्या मागील महामंडळाच्या इमारतीत स्थानांतरित झाले. २०१८ मध्ये एसटी महामंडळाची ही जागा गेली. रेल्वे स्थानकासमोरून सहा पदरी रस्ता होणार होता. तसेच रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे कामही सुरू आहे.

या कामांमुळे महामंडळाची जागा हातातून गेल्याची माहिती पुढे आली आहे. या जागेचा जवळपास ५५ कोटी रुपयांचा मोबदला शासनाकडून महामंडळाला मिळणार होता. मात्र, सात वर्षे लोटूनही जागेचा मोबदला अद्याप मिळाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोबदल्याचा प्रश्न शासनस्तरावरून निकाली निघेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असली तरी प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. महामंडळाला निधीसाठी ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घ्यावी लागत आहे. याबाबत बैठका झाल्या, महामंडळाने शासनस्तरावर पाठपुरावा केला. मात्र, प्रकरण रेंगाळलेलेच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तातडीने निर्णय घेऊन रेंगाळलेले प्रकरण मार्गी लागावे, अशी अपेक्षा महामंडळाला आहे.

गणेशपेठेतील फलाटांच्या कामांवर परिणाम

गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाच्या उर्वरित फलाटांचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. ते अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. विकासकामे करताना महामंडळाला निधीची अडचण आहे. सरकारकडून निधीबाबत हात आखडता घेतला जात असल्याने एसटीला नवसंजीवनी मिळणार कशी? असा सवाल निर्माण झाला आहे.

Jaysingpur News: जयसिंगपूरचा ‘स्मार्ट’ टायटल धोक्यात सत्तासंघर्षात रस्ते, गटारी, आणि विकासकामांचे वाजले बारा

रेल्वेने ज्या कारणासाठी एमपी बस स्टॅण्डच्या बाजूला असलेली महामंडळाची जागा घेतली. तेथे आता हॉटेल आणि चहा टपरी सुरू आहे. जागेचा योग्य उपयोग होत नाही. मात्र, शासनाकडून महामंडळाची जागाही गेली आणि आता मोबदलाही दिला जात नाही.

- अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.