Sharad Pawar: 'आघाडी'चे सर्वाधिकार पवारांना! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत निर्णय
esakal December 08, 2025 06:45 AM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही, या विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘कोअर समिती’च्या बैठकीत शनिवारी जोरदार चर्चा झाली. आघाडी करण्यावरून उपस्थित पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जोरात भूमिका मांडली.

अखेर आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्याचा ठराव मंजूर केल्यावर सुमारे तीन तास सुरू असलेली बैठक आटोपली. महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यावरून पक्षात गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. याबाबत व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रियांमधून नेते, कार्यकर्ते यांच्यातील मतभेदही उघड होत आहेत.

या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या बैठकीस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापू पठारे, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, विशाल तांबे तसेच जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, काका चव्हाण, रवींद्र माळवदकर, श्रीकांत पाटील, ॲड. भगवानराव साळुंखे, उदय महाले, पंडित कांबळे, सुरेंद्र पठारे, डॉ. सुनील जगताप आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी आघाडी आवश्यक आहे, विकासकामे करायची असतील तर, सत्तेत सहभाग हवा, एकत्र लढल्यास महापालिकेची सत्ता मिळवता येईल, पक्षाची स्थानिक स्तरावर ताकद वाढेल, असे मुद्दे आघाडीच्या बाजूने असलेल्यांनी मांडले. तर, निवडणूक झाल्यावर अजित पवार पुन्हा भाजपबरोबर जातील, त्यानंतर मतदारांना सामोरे कसे जायचे, महाविकास आघाडी म्हणून लढल्यास भाजपला रोखता येईल, आघाडी झाल्यास जागा वाटपात पुरेसा न्याय मिळेल, याबाबत शंका आहे, आजवरच्या भूमिकेला तिलांजली कशी द्यायची आदी मुद्दे महाविकास आघाडीच्या बाजूने असलेल्यांनी मांडले.

कोअर कमिटीमध्ये चर्चा करूनच पक्षाची भूमिका ठरली पाहिजे, त्यासाठी शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेतले पाहिजे, अशी भूमिकाही काही जणांनी मांडली.

Balasaheb Patil: सातारा जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीमय करणार: जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील; निवडणुकीबाबत काय म्हणाले.. बहुतांश नेत्यांना आघाडीच हवी ः जगताप

दरम्यान, या बैठकीपूर्वी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची मोदीबागेत भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘शहरात महाविकास आघाडीसोबतच लढण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत.’’ त्यानंतर कोअर समितीच्या बैठकीत जगताप यांनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसेच या बैठकीत बहुतांशी नेत्यांनी महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत न जाता महाविकास आघाडी म्हणून शहरात लढावे, अशी भूमिका मांडल्याचे जगताप यांनी सांगितले. पुढील दोन दिवसांत इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम व पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.