सूर्यकुमार यादव कर्णधार आहे म्हणून नाही तर…! 18 सामन्यांची आकडेवारी वाचून बसेल धक्का
GH News December 10, 2025 12:10 AM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून गतविजेत्या टीम इंडियाकडे पाहिलं जात आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरला आहे. उपकर्णधार शुबमन गिलनंतर सूर्यकुमार यादवच्या फॉर्मबाबतही बोंब आहे. त्यामुळे दोन महिन्यांनी टी20 वर्ल्डकप स्पर्धा असताना क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढत चालली. प्रत्येक सामन्यात आज काही तरी करेल अशी आशा घेऊन क्रीडाप्रेमी पाहात असतात. पण असं करता करता 18 सामने झाले. पण सूर्यकुमार यादवला काही सूर गवसताना दिसत नाही. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार आणि त्याच्या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भारत दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यातही असंच चित्र पाहायला मिळालं. सूर्यकुमार यादव शुबमन गिल बाद झाल्यानंतर मैदानात उतरला पण काही खास करू शकला नाही.

कर्णधार सूर्यकुमार यादव पहिल्या चेंडूपासून अडखळत खेळताना दिसला. त्याला हवी तशी फटकेबाजी करण्यासाठी रूम किंवा चेंडूच मिळत नव्हता. प्रतिस्पर्धी संघाने त्याच्यासाठी बरोबर जाळं टाकलं होतं. त्यामुळे त्याला फार काही करता आलं नाही. सुरुवातीला 8 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 2 धावा करून केल्या. त्यानंतर लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर एक चौकार आणि एक षटकार मारला. पण त्याच षटकात त्याला एनगिडीने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 11 चेंडूत 12 धावा केल्या आणि बाद झाला. सूर्यकुमारची कामगिरी पाहून क्रीडाप्रेमींनी आता कर्णधार असल्यानेच संघात स्थान मिळत असल्याची चर्चा सुरू केली आहे.

सूर्यकुमार यादव 2025 या वर्षात काहीच खास करू शकलेला नाही. त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक आलेलं नाही. या वर्षात कर्णधार सूर्यकुमार 18 सामने खेळला त्याने त्याने फक्त 196 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 15.07 ची होती. त्याचा स्ट्राईक रेट फक्त 126चा आहे. या वर्षभरात फक्त दोनच डावात 25च्या वर धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, हार्दिक पांड्याचं जोरदार कमबॅक झालं आहे. त्याने दक्षिण अफ्रिकी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने 28 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाने 20 षटकात 6 गडी गमवून 175 धावा केल्या आणि विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.