Dhananjay Munde: "...अन् धनंजय मुंडेंवरच डाव उलटला"; भाजपच्या आमदरानं डागली तोफ
Sarkarnama December 10, 2025 05:45 AM

Dhananjay Munde: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान धनंजय मुंडे यांनी आपल्याला नाहक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना केला होता. याद्वारे त्यांचा रोख मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडं होता. यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना जोरदार टोला लगावला आहे. ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा असं माध्यमांसमोर, कॅमेऱ्यावर कोण बोललं होतं? काय गरज होती? आता आलं ना गळ्यात, मग जा आता मॅपिंग, नार्को टेस्टला. मनोज जरांगे पाटील यांनी तुम्हाला आव्हान दिलं आहे. ते नार्को टेस्टला चला म्हणत आहेत, मग आता मागे का हटता? कोणी तुम्हाला टार्गेट करत नाही, तुम्ही स्वतःच टार्गेट होत आहात, अशा शब्दांत धस यांनी मुंडेंवर तोफ डागली.

IAS Tukaram Mundhe: 20 वर्षांच्या सेवेत तब्बल 24 वेळा बदली; आता धडाकेबाज तुकाराम मुंढेंची नोकरीच धोक्यात? 'हे' आहे प्रकरण

आपण माध्यमांसमोर जायचं, काही तरी बोलायचं आणि मग टीका झाली की मला टार्गेट केलं जातयं अससं म्हणायचं याला काही अर्थ नाही. धनंजय मुंडे यांना कोणीही टार्गेट करत नाही, ते स्वतःलाच टार्गेट करून घेत आहेत, याचा पुनरुच्चार धस यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभरापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत, त्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा खळबळजनक दावाही केला होता. यासंदर्भातील काही ऑडिओ क्लीपही त्यांनी माध्यमांसमोर आणल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना अटकही केली होती. जरांगे पाटील वारंवार धनंजय मुंडे यांची चौकशी करा, अशी मागणी करत आहेत.

Rohit Pawar: ऐन हिवाळी अधिवेशनात शरद पवारांच्या आमदाराला कोर्टाचं समन्स; अजितदादांच्या आमदाराची बदनामी?

दरम्यान, जरांगे पाटील यांनी हत्येच्या कटाचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत सगळे आरोप फेटाळून लावले होते. एवढेच नाही तर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करा, तसेच माझी आणि मनोज जरांगे पाटील दोघांचीही ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा, असं म्हणत आव्हान दिलं होतं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी सातत्यानं मुंडे यांना 'नार्को टेस्टला चल' म्हणत प्रतिआव्हान दिलं होतं. मात्र, गेल्या महिनाभरात मुंडे यांनी पुन्हा या विषयावर कुठलंही भाष्य केलं नव्हतं.

Shivsena MLA Mahendra Dalvi : पैशांनी भरलेली बॅग… नोटांची मोजणी! दानवे यांच्या ‘कॅश बॉम्ब’चा स्फोट होताच, दळवींचे खुले आव्हान, म्हणाले, ‘...तर मी राजीनामा!‘

पण आता नागपूरमध्ये पार पडत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांची आपल्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी सरकारने चौकशी करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी केली होती. या संदर्भात नागपूरात धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना आपल्याला सातत्याने टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला. यावर सुरेश धस यांना जेव्हा विचारलं, तेव्हा धनंजय मुंडेंवरच त्यांचा डाव उलटवला. नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग करा, अशी मागणी करत त्यांच्याच गळ्याशी हे प्रकरण आल्याचं धस यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.