Sugarcane Rate : ऊसदराची फुटली कोंडी; 'माळेगाव'कडून ३३०० रुपयांची उचल
esakal December 10, 2025 05:45 AM

माळेगाव - चालू गळीत हंगामासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्यानेही ‘सोमेश्वर’पाठोपाठ प्रतिटन ३३०० रुपये इतकी पहिली उचल देण्याचा निर्णय आज जाहीर केला. जिल्ह्यातील ही सोमेश्वरच्या सोबतीने उच्चांकी उचल ठरणार आहे. या बहुप्रतीक्षित निर्णयाने जिल्ह्यात ३१०० ते ३३०० रुपये उचलीचा ‘ट्रेंड’ चालू हंगामात तयार झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे माळेगाव कारखान्याच्या पहिल्या उचलीकडे आणि अंतिम दराकडे लक्ष असते. चालू गळीत हंगामात शेतकरी संघटनांच्या रेट्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर या उच्च उतारा क्षेत्रात एकरकमी एफआरपीच्या (रास्त दर) नियमानुसार ३५०० ते ३६०० रुपये प्रतिटन ट्रेंड निर्माण झाला आहे.

पुणे जिल्ह्यात तुलनेने साखर उतारा कमी असतो तरी त्यांच्यापेक्षा शे-दोनशे कमी मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र शेतकरी संघटना आणि कारखानदार दोन्ही घटक शांतच होते. अखेर उताऱ्यानुसार पुणे जिल्ह्यात सोमेश्वरने जाहीर केलेली प्रतिटन ३३०० ही उचल शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आणि जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासात उच्चांकी होती.

यानंतर जिल्ह्यात कारखाने मौनातच राहिले. नुकतीच नीरा-भीमा व छत्रपतीने ३१०१ रुपये प्रतिटन उचल जाहीर केली. त्यामुळे आता माळेगाव काय करणार यावर जिल्ह्यातील अन्य कारखान्यांची स्ट्रॅटेजी ठरणार आहे. माळेगावनेही गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३३०० रुपये प्रतिटन इतकी एकरकमी उचल देण्याचा निर्णय घेतला.

आता जिल्ह्यातील अन्य कारखान्यांना याच्या आसपास राहावे लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक चित्र आहे. यापेक्षा कमी उचली दिल्यास शेतकरी ऊस देणे टाळतील, अशी शक्यता आहे. त्यामुळेच चौदा दिवस७ उचल देण्याऐवजी गाळप उरकून घेण्यावर भर दिसत आहे.

माळेगावची चालू हंगामाची एफआरपी ३२७० रुपये प्रतिटन इतकी आहे. उपमुख्यमंत्री व अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने एफआरपीपेक्षा ३० रुपये अधिक म्हणजेच ३३०० रुपये प्रतिटन उचलीचा निर्णय घेतला आहे.

- अशोक पाटील, कार्यकारी संचालक, माळेगाव साखर कारखाना

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.