केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
परशराम पाटील, एबीपी माझा May 27, 2026 06:13 PM

Pinarayi Vijayan ED Raid: केरळमधील तिरुवनंतपुरम येथे माजी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी आलेल्या अंमलबंदी संचालनालयाच्या (ईडी) पथकावर विजयन यांच्या समर्थकांनी हल्ला केला. 12 सदस्यीय पथकाने आज बेकरी जंक्शन येथील विजयन यांच्या निवासस्थानी छापा टाकला. त्यांच्या मुलीच्या 'एक्झालॉजिक सोल्युशन्स' या आयटी कंपनीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले. हे प्रकरण 'कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड' (सीएमआरएल) द्वारे केलेल्या मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे.

केरळ उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

ईडीचा तपास रद्द करण्याची मागणी कंपनीने केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी केरळ उच्च न्यायालयाने सीएमआरएलची याचिका फेटाळली. ईडीने या प्रकरणात 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता. सीएमआरएल नावाच्या कंपनीने 2018-19 दरम्यान विजयन यांची मुलगी टी. वीणा यांच्या 'एक्झालॉजिक सोल्युशन्स' या आयटी कंपनीला ₹1.72 कोटी दिले. कोणतेही सॉफ्टवेअर किंवा आयटी सेवा न देता, हे पैसे बनावट खर्च म्हणून देण्यात आले असल्याचा आरोप आहे. हा खुलासा झाल्यानंतर, ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

ईडीने 2024 मध्ये पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला

या आरोपांची चौकशी करण्यासाठी ईडीने 2024 मध्ये पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला. हा मुद्दा विजयन सरकारसमोरील सर्वात राजकीयदृष्ट्या संवेदनशील वादांपैकी एक राहिला आहे. ईडीच्या तपासाव्यतिरिक्त, गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) देखील या प्रकरणाचा तपास करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.