सुपरहिट सिनेमा 'दुनियादारी'च्या सीक्वेलची घोषणा होऊनही सिनेमा का नाही आला? दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क May 27, 2026 06:13 PM

Marathi Director Sanjay Jadhav On Duniyadari 2: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) आघाडीचे दिग्दर्शक (Marathi Director), सिनेमेटोग्राफर (Cinematographer) आणि निर्माते संजय जाधव त्यांच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. दिग्दर्शक संजय जाधव यांनी नुकतीच सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. तरुणाईला आवडणाऱ्या विषयांवर अनेक सुपरहिट सिनेमे करणाऱ्या आणि कायम हसतमुख असणाऱ्या मराठमोळ्या दिग्दर्शकानं तब्बल दोनदा स्वतःला संपवण्याचा विचार केलेला. तसेच, या मुलाखतीत बोलताना त्यांनी घोषणा करुनही 'दुनियादारी 2' का आला नाही, हेसुद्धा सांगून टाकलं. 

मराठीतला सुपरहिट सिनेमा 'दुनियादारी'चं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलेलं. सुहास शिरवळकर यांच्या गाजलेल्या 'दुनियादारी' कादंबरीवर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला. सिनेमातली पात्र, यातली गाणी यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला. 2013 साली रिलीज झालेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर त्यावेळी 32 करोड रुपयांची कमाई केलेली. त्यानंतर दुनियादारी सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सुरु झाली. तशी घोषणाही करण्यात आली, पण सिनेमा काही आलाच नाही. याचंच उत्तर आता संजय जाधव यांनी दिलंय. 

'दुनियादारी 2'बाबत काय म्हणाले, दिग्दर्शक संजय जाधव?

मराठीतला सुपरहिट सिनेमा 'दुनियादारी'चे दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगितलं की, "मी 'दुनियादारी 2' करणार नाही, असं ठरवलंय. मी 'दुनियादारी'पेक्षा 'दुनियादारी 2' कितीही सुंदर बनवला, तरीही तुलना होणारच... की अरे नाही पहिल्यासारखी मजा नाही... सोशल मीडियावर बोलणं खूप सोपं आहे, पण त्यामागची मेहनत लोकांना कळत नाही... हे मला झेपणार नाही... दुसरं म्हणजे, 'दुनियादारी 2' हा प्रोजेक्ट ऑन होऊन इतक्या वेळेला ऑफ झालाय की, मला वाटतंय वरून सुहास शिरवळकर सांगत असतील की, नकोत करू... तो एक सिग्नल पण घेतला पाहिजे आणि त्या गोष्टीचा आदरही केला पाहिजे..."

पुढे बोलताना संजय जाधव यांनी सांगितलं की, "'दुनियादारी 2'ची दोनदा घोषणा करण्यात आली. ज्यावेळी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझं 'दुनियादारी'चं वर्कशॉप सुरू होणार होतं. पण मग ते थांबलं... त्यानंतरही अनेकदा सिनेमाचं काम काही ना काही कारणामुळे थांबलं..."

"'दुनियादारी' हे माझं बाळ आहे. चांगलं, वाईट जे काही आहे ते मी बनवलंय. आता माझ्यावर किंवा माझ्या स्क्रिप्टवर लोकांचा विश्वासच नाही... सगळे हेच विचारतात, कास्टिंग तेच आहे ना? असं नका ना करू यार... त्या कलाकारांना न घेता मी काम करणारच नाहीये का? पण तुम्ही माझ्यावर काहीतरी विश्वास दाखवा... जर तुम्हाला माझ्यावर विश्वास दाखवायचाय तर मग मला पण काम करायचं नाही...", असं त्यांनी स्पष्ट केलं.

'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.