जहाजावरील हल्ल्यानंतर मदतीसाठी नौदलाची धाव : व्हिडिओ शेअर करत मागितली होती मदत
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दोहा
दोन महिन्यांच्या शस्त्रसंधीत इराण आणि इस्रायलने पहिल्यांदाच एकमेकांवर हल्ला केल्याने संपूर्ण मध्य-पूर्वेत तणाव वाढला आहे. या तणावाचे पडसाद आता पुन्हा एकदा होर्मुझ सामुद्रधुनीमध्येही उमटत आहेत. या भागातून जाणाऱ्या एका जहाजावर हल्ला झाला असून, त्यात 24 भारतीय खलाशी जहाजावर अडकून पडले होते. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल होत असून सदर खलाशी मदतीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ तेलवाहू जहाजाला आग लागल्यानंतर भारतीय नौदलाने त्यावरील 24 भारतीय खलाशांची यशस्वीपणे सुटका केली आहे.
फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडियाने आपल्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात ओमानच्या किनाऱ्याजवळ अडकलेले 24 भारतीय खलाशी भारतीय नौदलाकडे तात्काळ मदतीची मागणी करत असल्याचे नमूद केले आहे. व्हिडिओमध्ये जहाजातून काळा धूर निघताना दिसत आहे. हा व्हिडिओच्या आधारने भारतीय नौदलाने सदर खलाशांच्या मदतीसाठी दुतावास आणि सुरक्षा दल अशा दोन्ही पातळीवर मदतीसाठी प्रयत्न सुरू केले होते.
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ तेलवाहू जहाजावर अडकलेल्या सर्व 24 भारतीय कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. नौवहन महासंचालनालयाच्या (डीजीएस) माहितीनुसार, सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील पाण्यातून प्रवास करत असताना ही घटना घडली. गेल्या काही महिन्यांत या भागात अनेक जहाजांवर हल्ले झाले आहेत. हा हल्ला अमेरिकन नौदलाने केला असावा असा अंदाज आहे, मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
सर्व 24 कर्मचारी सुरक्षित
जहाजाला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. भारतीय खलाशांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. सर्व 24 कर्मचारी सुरक्षित असून त्यांना आवश्यक ती मदत मिळत आहे. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, संबंधित सागरी प्राधिकरणांशी समन्वय साधत आहेत.
होर्मुझ खुला राहील, पण शुल्क लागू होईल : इराण
या हल्ल्यादरम्यान रशियातील इराणचे राजदूत काझेम जलाली यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली जाणार नाही, परंतु नवीन अटी लागू होतील, ज्यामध्ये पारगमन शुल्क (टोल) आकारण्याचा समावेश असू शकतो, असे स्पष्ट केले आहे. रशियन वृत्तपत्र ‘इझव्हेस्तिया’ला दिलेल्या मुलाखतीत ‘होर्मुझ निश्चितपणे खुला राहील, परंतु नवीन अटी इराण आणि ओमानच्या अधिकाऱ्यांकडून ठरवल्या जातील’ असे म्हटल्याचे दिसते.