डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन
‘‘डॉक्टर, बेल्ट लावला की बरं वाटतं… मग दिवसभर लावून ठेवू का?’’...
हा प्रश्न जवळजवळ रोज ओपीडीमध्ये ऐकायला मिळतो. कुणी मेडिकलमधून स्वतः घेऊन येतो, कुणाला नातेवाईक सांगतात, तर कुणी यूट्युब पाहून वापर सुरू करतो. काही रुग्ण तर महिने-महिने कंबर बेल्ट किंवा मान बेल्ट (cervical collar) सतत वापरत असतात. कारण एकच - बेल्ट लावला की वेदना कमी जाणवते.
पण महत्त्वाचा प्रश्न आहे, की बेल्ट वेदना बरी करतो का, की फक्त वेदना कमी जाणवते? याचं उत्तर समजलं, की बेल्ट कधी लावायचा आणि कधी काढायचा हे सहज कळतं.
बेल्टकडून होणारे काम
कंबर बेल्ट किंवा मान बेल्ट हा औषध नाही. तो एक सपोर्ट (support) आहे. आपल्या कण्याला आधार देण्याचं मुख्य काम स्नायू करतात - विशेषतः पाठीचे आणि पोटाचे (core muscles). जेव्हा वेदना, सूज, दुखापत किंवा डिस्कचा त्रास होतो, तेव्हा हे स्नायू नीट काम करू शकत नाहीत. तेव्हा बेल्ट बाहेरून कण्याला आधार देतो. म्हणजेच - बेल्ट हा कण्याचा कायमचा आधार नसून तात्पुरता ‘बाह्य आधार’ आहे.
बेल्टमुळे बरं का वाटतं?
यामागे तीन साधी कारणे आहेत :
हालचाल कमी होते
बेल्ट लावल्यावर आपण अचानक वाकत नाही, वळत नाही. त्यामुळे दुखणारा भाग शांत राहतो.
स्नायूंवरील ताण कमी होतो
दुखत असलेल्या स्नायूंना थोडा आराम मिळतो. त्यामुळे वेदना कमी जाणवते.
मानसिक आत्मविश्वास वाढतो
रुग्णाला वाटतं ‘आता कणा सुरक्षित आहे’ आणि हालचाली करताना भीती कमी होते.
बेल्ट चांगलाच आहे ना?
हो; पण फक्त योग्य काळासाठी. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा बेल्ट उपचार बनतो.
अनेक रुग्ण दोन-तीन महिने सतत बेल्ट वापरतात. काही तर वर्षानुवर्षे वापरतात. यामुळे उलट नुकसान सुरू होतं.
सतत बेल्ट वापरल्याचे तोटे
स्नायू कमकुवत होतात
शरीर खूप हुशार असतं.
जे काम बेल्ट करतोय, ते काम शरीराचे स्नायू हळूहळू बंद करतात.
यामुळे पाठीचे व पोटाचे स्नायू कमजोर होतात.
बेल्टवर अवलंबित्व वाढतं
बेल्ट काढला, की लगेच वेदना वाढते — कारण आता कणा स्वतः उभा राहण्याची सवय विसरतो.
मूळ आजार बरा होत नाही
डिस्क, पोस्चर, स्नायूंची कमजोरी - ही कारणं तशीच राहतात.
म्हणजेच - बेल्ट जास्त वापरला की कणा मजबूत न होता अधिक आळशी होतो.
बेल्ट कधी वापरावा?
अचानक कंबरदुखी (acute pain)
मसल स्पॅझम / पाठ अडकणे
स्लिप डिस्कचा तीव्र त्रास
जड प्रवास किंवा तात्पुरता ताण
काही फ्रॅक्चर किंवा ऑपरेशननंतर (डॉक्टरांच्या सल्ल्याने)
बेल्ट कधी टाळावा?
साधी जुनाट कंबरदुखी
रोजच्या कामासाठी
ऑफिसमध्ये दिवसभर
झोपताना
महिनोनमहिने सवयीने
साधा नियम लक्षात घ्या, की बेल्ट हा उपचाराचा भाग आहे, जीवनशैली नाही.
योग्य वापर कसा करावा?
दिवसातून फक्त दोन-चार तास
सतत नाही - गरजेनुसार
व्यायाम करताना काढून टाका
झोपताना कधीच नको
डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने
सर्वांत महत्त्वाचं, बेल्टसोबत core strengthening exercises आवश्यक आहेत.
बेल्ट हा कण्याचा मित्र आहे; पण कायमचा आधार नाही. लक्षात ठेवा,
कणा बेल्टमुळे मजबूत होत नाही, तो मजबूत होतो योग्य हालचाल, व्यायाम, पोश्चर आणि सवयींमुळे.
कधी कधी बेल्ट लावायला हरकत नाही; पण आयुष्यभर बेल्टवर अवलंबून राहू नका. उपचार बेल्ट नाही, तर तुमचे स्नायू आहेत.