दिल्लीतील संसद मार्गावरील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’मध्ये ‘इंडिया’ आघाडीची जबर्दस्त बैठक पार पडली. जवळपास दोन-अडीच वर्षांनी मंडळी (एकमेकांना) भेटत होती. या बैठकीमुळे भारतात स्थित्यंतर घडणार, यात आता काही शंका उरली नाही. इंडिया आघाडीची मूठ (पुन्हा एकदा) वळणार, या कल्पनेने सत्ताधाऱ्यांची गाळण उडाली होती. स्वाभाविक आहे, देशात सध्या क्रांतीचा माहौल आहे. आधीच दिल्लीत झुरळांनी उच्छाद मांडला. त्यात ही जबर्दस्त बैठक! काय होणार?
आणखी तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत मोदी सरकारच्या खांद्यावर झोळी देऊन हिमालयात परत पाठवण्याचा संकल्प (पुन्हा एकदा) सोडण्यात आला. एक साधी कॉक्रोच पार्टी एकजूट दाखवू शकते, तर आपण का नाही? असा सवाल एकमेकांना करुन सर्व नेत्यांनी मुठी उगारुन उगारुन ऐक्याच्या (पुन्हा एकदा) आणाभाका घेतल्या. या बैठकीचा वृत्तांत आम्ही देणार आहो. कारण ही अतिशय महत्त्वाची घटना आहे, हे कोणीही सांगेल.
बैठकीच्या सुरवातीलाच श्रीमती गांधी यांच्या शेजारच्या खुर्चीत येऊन बंगालच्या ममतादिदी (पटकन) बसल्या. श्रीमती गांधी त्यांच्याकडे बघून हसल्या, (त्यामुळे) त्यांच्या जिवात जीव आला. ‘प्रोनाम! मला वाटलं की मी इलेक्शन हरले म्हणून कोणी ओळखही दाखवणार नाही,’’ दिदी पदराने अश्रू पुसत म्हणाल्या.
‘‘छे, असं कुठं असतं, आपल्यात?’’ श्रीमती गांधी मेहबूबा मुफ्ती यांच्याकडे बघून हसत म्हणाल्या. दिदींनी आसपास पाहिले. सगळेच एकमेकांना ओळख दाखवणारे होते.
‘‘मी कोलकात्याहून शाँदेश मिठाई आणणार होते, पण म्हटलं, निवडणुकीत हरल्याची मिठाई कशी वाटायची? म्हणून नाही आणली,’’ दिदींनी कबुलीजबाब दिला.
श्रीमती गांधींच्या उजव्या हाताला मल्लिकार्जुनजी खडगे बसले होते. त्यांना बरेच काही बोलायचे असावे. पण त्यांच्या डाव्या हाताला राहुलजी येऊन बसले. सलग ९९ निवडणुका जिंकणाऱ्या अजिंक्यवीरासारखी त्यांची विजयी मुद्रा बघून उरलेल्या २३ पक्षांच्या नेत्यांना हुरुप आला. यूपीचे अखिलेशजी सहज येऊन सायकलीवर डबलसीट बसावे, तसे त्यांच्या उजव्या हाताशी येऊन बसले.
‘‘सध्या काय चाललंय?,’’ राहुलजींनी विचारले.
‘‘निवांत!’’ अखिलेशजी म्हणाले. तसे जमलेले सगळेच कमीअधिक प्रमाणात निवांतच होते.
‘‘पुढली निवडणूक आपण जिंकणार, मोदी सरकार ऑलरेडी आपल्याला घाबरलंय! माझ्या डोळ्याला डोळा भिडवू शकत नाहीत! पटापट आपला नेता निवडा, आणि कामाला लागा!,’’ राहुलजींनी थेट मुद्द्याला हात घातला. सगळ्यांनी माना डोलावल्या. हाच तर बैठकीचा मुख्य अजेंडा होता. तेवढ्यात कुणीतरी टीव्हीच्या पडद्याकडे लक्ष वेधले. तिथे मुंबई (वांद्रे) येथून उधोजीराव ठाकरे हातवारे करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्याची धडपड करत होते.
‘‘ते ऑनलाइन जोडले गेले आहेत, त्यांचं कुणीतरी ऐका रे!,’’ कुणीतरी म्हणाले.
‘‘ अरे, मी वर्क फ्रॉम होम करतोय! ऐका ना…मी आधीपासून म्हणतोय, आधी पंतप्रधानपदाचा चेहरा निवडा, मग निवडणुकांना सामोरे जा! पंतप्रधान कोण होणार? हे एकदा ठरलं की पुढचं सगळं सोपं आहे,’’ उधोजी तावातावाने सांगत होते. हा मुद्दा अतिशय व्हॅलिड होता. पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणताच सगळे खुर्चीत ताठ बसले. कारण मुद्दा व्हॅलिड असला तरी त्यावरची चर्चा इनव्हॅलिड होती. या मुद्द्यावर नेमक्या कुठल्या मुद्द्यानिशी विषयांतर करावे, यावर चर्चा सुरू झाली. तेवढ्यात ममतादिदी किंचाळल्या : ‘‘फुटलं, फुटलं! पुन्हा फुटलं!!’’
‘‘पक्ष म्हणताय का? तो आधीच फुटलाय की!’’ श्रीमती गांधी कुजबुजल्या.
‘‘माझं नशीब!’’ असे पुटपुटत ममतादीदी तिथून उठल्याच. बैठक संपल्यावर (पुन्हा एकदा) ग्रुप फोटो काढायचा की नाही, यावर बराच वेळ चर्चा झाली. शेवटी पुन्हा एकदा भेटायचे ठरले.