Maharashtra Finance Ministry : अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे? पावसाळी अधिवेशनाआधी निर्णय होणार? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं...
esakal June 09, 2026 11:45 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेले अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्पुरते सोपविण्यात आले. मात्र, आता पाच महिने पूर्ण झाल्यानंतर हे खाते ‘राष्ट्रवादी’कडे पुन्हा सोपविण्यात आलेले नाही. आता हे खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून मुंबईत सुरू होत आहे. त्यापूर्वी अर्थ खात्याबाबत निर्णय व्हावा यासाठी ‘राष्ट्रवादी’चे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. हे खाते ‘राष्ट्रवादी’कडे अद्याप परत आलेले नसल्याने पक्षातील काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘कोअर कमिटी’च्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अर्थ खात्यावरून खंत व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी तटकरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले, की ‘राष्ट्रवादी’चे सर्व प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन हे खाते पुन्हा पक्षाकडे देण्याबाबत चर्चा करणार आहे.

Kolhapur ZP : ‘जनसुराज्य’च्या आडून राष्ट्रवादीवर दबाव; भाजपचे राजकारण, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशक्य असल्याचाही फायदा वर्धापनदिन ११ जूनला

राष्ट्रवादी काँग्रेसचा १० जून रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेला वर्धापनदिन कार्यक्रम आता ११ जून रोजी दुपारी दोनला होणार असल्याची माहिती तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान मोदींनी १० जून रोजी नवी दिल्ली येथे बोलावलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) महत्त्वपूर्ण बैठकीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मी कबड्डीचा खेळाडू; बुद्धिबळ येत नाही’

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळ यांच्या नाराजीनंतर पक्षातील अंतर्गत अस्वस्थता आणि राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. राज्यसभेची संधी हुकल्यानंतर भुजबळ यांनी आपल्या भावना पत्रकारांपुढे व्यक्त केल्या. ‘‘इतरांची मुले राज्यसभेवर, लोकसभेवर आणि मंत्रिपदावर आहेत. पक्ष स्थापन करण्यापासून मी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मलासुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी होती. मी कबड्डीचा खेळाडू आहे. बुद्धिबळाचा खेळाडू नाही. मला बुद्धिबळ कळत नाही, ’’ अशा शब्दांत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यांची बोलण्याची पद्धत अशीच : तटकरे

भुजबळ यांची बोलण्याची पद्धत अशीच आहे, असे सांगत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षात नाराजी असल्याचा आरोप फेटाळून लावला. ‘‘त्यामुळे भुजबळ माझ्याबद्दल असे बोलले असतील, असे मी मानत नाही. माझा राजकीय प्रवास आणि कारकीर्द त्यांना चांगली माहिती आहे. त्यांचा मान मोठा आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या अनेक गोष्टी यापूर्वी घडल्या आहेत आणि पुढेही घडतील, ’’ असे म्हणत त्यांच्या नाराजीच्या चर्चा फेटाळल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.