Pune Water Supply: पुण्यात सोमवारपासून दिवसाआड पाणी; महापौरांच्या बैठकीत निर्णय, घटत्या पाणीसाठ्यामुळे पाऊल
esakal June 09, 2026 11:45 AM

पुणे: खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने पुणे महापालिकेने सोमवारपासून (ता. १५) शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..

एप्रिलमध्ये पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाणीकपात करण्याची सूचना केली होती. मात्र, महापालिकेने ३१ मेपर्यंत शहरात पाणीकपात न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा (९० टक्के) अंदाज वर्तवल्याने आणि खडकवासला धरण प्रकल्पात केवळ पाच ‘टीएमसी’ पाणी शिल्लक असल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. शेतीसाठी आवर्तन, आषाढी वारी आणि आगामी पावसाळ्यातील अनिश्‍चितता लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. या निर्णयाचे अधिकृत परिपत्रक पुढील दोन दिवसांत काढले जाणार आहे.

नागपुरे म्हणाल्या, ‘‘पाणीकपात करण्यासह पाण्याची बचत करण्यासंदर्भात विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. कपात करताना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून, सोमवारपासून याची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे‌. वॉशिंग सेंटर, जलतरण तलावांवर पूर्णपणे निर्बंध घातले जाणार आहेत.’’

मोठ्या पावसाची प्रतीक्षा :

महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन झाले असून, पाणीकपातीची अंमलबजावणी करण्यासाठी एक आठवडा आहे. या काळात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुणे शहर व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होऊन जलसाठा वाढल्यास कदाचित एक दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही. मात्र, मोठा पाऊस झाला नाही; तर पाणीकपात होणार, हे निश्‍चित आहे.

सर्वांना बरोबर घेऊन निर्णय :

महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू आहेच. पण, सत्ताधारी भाजपमध्येही श्रेयवाद सुरू असतो, त्यामुळे पदाधिकारी वेगवेगळ्या बैठका घेताना दिसतात. मात्र, आज पुणेकरांचा रोष ओढावून घेण्याची शक्यता असल्याने पाणीकपातीच्या निर्णयासाठी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष एकत्र आले. शिवाय, विरोधकांना आणि प्रशासनाला बरोबर घेतल्याचे चित्र दिसून आले.

पाणी बचतीसाठी उपाययोजना

१. गाड्या धुवण्यासाठी पिण्याचे पाणी वापरता येणार नाही

२. वॉशिंग सेंटर बंद होणार

३. जलतरण तलाव बंद होणार

४. बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी

५. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील शुद्ध पाणी बांधकाम, उद्यान व अन्य ठिकाणी वापरण्याची सक्ती

६. शहरातील विहिरी, कूपनलिकांची माहिती संकलित करून तेथील पाणी वापर करण्याचा प्रयत्न

Mahabaleshwar Khed Bridge: सह्याद्रीत उभा राहिला ‘मिनी सी-लिंक’! महाबळेश्वर-खेड जोडणारा भव्य पूल वाहतुकीसाठी सज्ज, प्रवास होणार सुसाट, कधी खुला होणार? दोन दिवसांत परिपत्रक : आयुक्त

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन महिन्यांचे पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला जाईल. या संदर्भात पुढील दोन दिवसांत परिपत्रक काढून सूचना जाहीर करू. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जास्त पाणी वापरणारी ठिकाणे बंद केली जातील. तसेच, गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नवलकिशोर राम यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.