Dadar BEST bus accident ब्रेक फेल झाला, जे शक्य होतं ते केलं; बेस्ट चालकाचा दावा, गुन्हा दाखल
esakal June 09, 2026 12:45 PM

मुंबई, ता. ८ : अनियंत्रित बेस्ट बसमुळे दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाजवळ सोमवारी सकाळी घडलेल्या अपघातास जबाबदार धरत शिवाजी पार्क पोलिसांनी चालक विकास पाडावे (४३) याच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलिस उपआयुक्त महेंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार 'पाडावेविरोधात निष्काळजीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे, सार्वजनिक रस्त्यावर भरधाव व निष्काळजीने वाहन हाकणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी चालक अपघातात जखमी झाला असून, त्याच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Dadar BEST Accident: Probe Begins After Driver's Claim

पाडावे याचा जबाव शिवाजी पार्क पोलिसांनी नोंदवला. 'ब्रेक फेल झाल्याने टिळक पुलाच्या उतारावर वाढलेला वेग कमी करणे अशक्य झाले, जीवितहानी टाळण्यासाठी जे काही करणे शक्य होते ते केले.' असा दावा पाडावे याने केल्याचे सांगण्यात आले.

Dadar Accident: दादरमध्ये बेस्टची गाड्यांना धडक, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

अशी घडली घटना

अपघातग्रस्त वातानुकूलित बेस्ट बस दादर टीटी येथून माहीमच्या दिशेने जात होती. टिळक पूल ओलांडल्यावर वीर कोतवाल उद्यानाजवळील उतारावर ती अनियंत्रित झाली आणि त्याच वेगात उद्यानाला यू-टर्न घेत बस प्लाझा चित्रपटगृहापुढे रस्त्याकडेला उभ्या पोकलेनला जाऊन आदळली. यादरम्यान बसने एका पादचाऱ्यासह दोन दुचाकी, दोन खासगी कार, एका टॅक्सीला धडक दिली.

....अन्यथा मोठा अपघात झाला असता

पोलिसांनी अपघाताच्या तपासासाठी प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही चित्रणानुसार 'चालकाने अवघ्या काही सेकंदात प्रसंगावधान राखल्याचे स्पष्ट होते. अचानक अनियंत्रित झालेली बस कोतवाल उद्यानासमोरून सरळ अर्थात न. चिं. केळकर मार्गावरून माहीमच्या दिशेने जाणे अपेक्षित होते. मात्र, तेथे वाहतूक खोळंब्यात अनेक वाहने उभी होती. त्या मार्गावर बस घेतली असती, तर ती अनेक वाहनांना धडकून मोठी हानी अपेक्षित होती. हे लक्षात घेत चालक पाडावे याने बस त्याच वेगात उजवीकडे वळण घेऊन तुलनेने कमी रहदारी असलेल्या प्लाझा चित्रपटगृहाच्या मार्गावर नेली आणि समोर दिसणाऱ्या पोकलेनला धडकावून रोखली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.