Ben Stokes चा नाईटक्लबमध्ये पुन्हा राडा! लॉर्ड्सच्या विजयानंतर कसोटी कर्णधारपदही धोक्यात; इंग्लंड कठोर शिक्षा देण्याच्या तयारीत
esakal June 09, 2026 12:45 PM

इंग्लंडने नुकतेच लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रविवारी (६ जून) ११५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली.

पण यानंतर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि गोलंदाज गस ऍटकिन्सन (Gus Atkinson) अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) चौकशी सुरू केली आहे. सोमवारी (७ जून) पहाटे नाईटक्लबमध्ये एका अज्ञात घटनेमुळे (Nightclub Incident) त्यांच्यावर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.

ENG vs NZ: लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय; WTC Points Table मध्येही उलथापालथ; पाहा कोण कोणत्या स्थानी

दरम्यान, नाईटक्लबमध्ये नेमकं काय घडलं होतं, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही, पण ECB ने दिलेल्या माहितीनुसार या दोघांकडूनही संघाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. तसेच ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार ही घटना इतकी गंभीर आहे की बेन स्टोक्सचे कर्णधापदही धोक्यात आले आहे.

ECB ने सोमवारी संध्याकाळी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची चौकशी क्रिकेट नियामकाकडे सोपवण्यात आली आहे. हा तपास सुरू असताना स्टोक्स आणि ऍटकिन्सन हे १७ जूनपासून ओव्हल येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे.

या घटनेत दोन्ही खेळाडूंपैकी कोणत्याही खेळाडूला दुखापत झालेली नाही. तसेच या घटनेत सारासेन्स रग्बी क्लबचे खेळाडूही सामील असल्याची माहिती मिळावी आहे. ते त्यांच्या सिजन संपल्याचे सेलिब्रेशनसाठी तिथे होते.

ही घटना ऍटकिन्सन आणि एका अज्ञात अकादमी खेळाडू यांच्यातील मतभेदातून घडली असल्याचे समजत आहे. ECB ने दिलेल्या माहितीनुसार स्टोक्स आणि ऍटकिन्सन यांच्या उपस्थितीत एक घटना घडली, त्याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. दुसऱ्या कसोटीसाठी संघाबाबतची घोषणा योग्य वेळी करू. सध्या नियमकांना कळवण्यात आले असून शक्य झाल्यास आम्ही पुढील माहिती देऊ.

दरम्यान, सारासेन्स क्लबकडूनही स्टष्ट करण्यात आले आहे की त्यांच्या अकादमीचा खेळाडू या घटनेत सामील होता. तसेच पुढील माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनीही सांगितले.

ENG vs NZ: पहिल्या दिवशी १६ अन् दुसऱ्या दिवशी १७ विकेट्स, लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजांचा बोलबाला; तिसऱ्याच दिवशी लागणार निकाल?

तथापि, बेन स्टोक्स किंवा इंग्लंडचे खेळाडू अशा प्रकारे नाईटक्लबमधील वादामुळे अडचणीत येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही बेन स्टोक्सला २०१७ मध्ये नाईटक्लबमध्ये झालेल्या हाणामारीमुळे शिक्षा भोगावी लागली होती. त्याशिवाय काही महिन्यांपूर्वी एका बाउन्सरसोबत रात्री उशिरा घडलेल्या एका घटनेनंतर इंग्लंडचा उपकर्णधार हॅरी ब्रुकला दंड ठोठावण्यात आला होता आणि ताकीद देण्यात आली, ज्यामध्ये जेकब बेथेललाही त्याच्या वर्तनाबद्दल ताकीद देण्यात आली होती.

आता चौकशी सुरू असताना जर स्टोक्स दुसरा कसोटी सामन खेळला नाही, तर मात्र ब्रुक इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसेल. पण अद्याप इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर केलेला नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.