डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी), प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी
श्वास घेणे ही इतकी नैसर्गिक आणि अनैच्छिक प्रक्रिया आहे, की त्याचे महत्त्व श्वास कमी पडू लागल्यावरच कळते. प्रत्येक श्वासाबरोबर आपण शुद्ध हवा (ऑक्सिजन युक्त) शरीरात घेतो आणि कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडतो. फुप्फुस हा ऑक्सिजन रक्तात पोहोचवण्याचे काम करते. त्यामुळे या अवयवाची क्षमता कमी झाल्यास रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि शरीरातील पेशी योग्य प्रकारे कार्य करू शकत नाहीत.
दीर्घकालीन श्वसनाचे आजार
वाढत्या वयाबरोबर फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते; पण प्रदूषण किंवा संसर्गामुळे श्वसनलिकेला येणारी सूज यामुळे ही प्रक्रिया लवकर घडून येते. वाढते शहरीकरण, वाहनांची संख्या, औद्योगिक प्रदूषण आणि बदलती जीवनशैली यांमुळे श्वसनविकारांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. प्रदूषणात वावरल्याने आणि सिगारेट फुंकल्यामुळे श्वासनलिकेच्या नाजूक आवरणाला आणि फुप्फुसाच्या पेशींना दुखापत होते आणि हे वर्षानुवर्षे होत राहिले तर श्वासनलिकेत आणि फुप्फुसात कायमस्वरूपी बदल घडून येतात. यालाच सीओपीडी आणि ‘इंटरस्टिशियल लंग डिसिज’ म्हणतात.
टीबीसारख्या संसर्गामध्ये जीवाणूमुळे फुप्फुसाच्या पेशींचा नाश होऊन त्याची कार्यक्षमता कमी होते. परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.
लक्षणे
धाप लागणे, सतत खोकला येणे, छातीत घरघर होणे किंवा दैनंदिन कामे करताना थकवा जाणवणे ही अनेकांना भेडसावणारी लक्षणे आहेत. याबरोबरच स्नायूंना पुरेसा प्राणवायू ना मिळाल्याने अशक्तपणा, प्रमाणाबाहेर शारीरिक थकवा या समस्याही दिसून येतात. यामुळे रुग्ण कष्टाची कामे टाळतो, जीवनशैली बैठी होते आणि जीवनशैलीविषयक इतर आजार बळावतात. या रुग्णांमध्ये फुप्फुसे पूर्ववत होऊ शकत नसली, तरी योग्य उपचारांनी लक्षणे आटोक्यात आणता येतात आणि कार्यक्षमतेचा होणार ऱ्हास कमी करता येऊ शकतो. म्हणून वरील लक्षणे दोन-तीन आठवडे आढळून आल्यास श्वसनविकार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
पल्मनरी फिजिओथेरपी
पल्मनरी फिजिओथेरपी म्हणजे श्वसनविकारात दिले जाणारे भौतिकोपचार हा पल्मनरी रिहॅबिलिटेशनचा महत्त्वाचा भाग आहे. ही फिजिओथेरपीची एक विशेष शाखा आहे. यामध्ये श्वसन आणि इतर शारीरिक व्यायाम सांगितले जातात. त्यामुळे लागणारा दम कमी होतो, ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, स्नायूंचे आरोग्य सुधारते आणि कार्यक्षमता वाढते. परिणामी रुग्णाचा दैनंदिन सहभाग सुधारतो.
अ] श्वसनाचे व्यायाम प्रकार : यामध्ये तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली योग्य खोली आणि लयीत श्वासाचे व्यायाम केले जातात. यामुळे उच्छ्वासाला होणार अडथळा कमी होतो आणि फुप्फुसाच्या खोलीपर्यंत ऑक्सिजन पोचतो. साठलेला कफ बाहेर पडतो. या सर्व क्रियांमुळे ऑक्सिजनचे रक्तातील हस्तांतरण वाढते, लक्षणांची तीव्रता कमी होते आणि आरोग्य सुधारते.
ब] शारीरिक व्यायाम प्रकार : यात एरोबिक आणि ताकदीचे व्यायाम दोघांचाही समावेश होतो. हे व्यायाम अगदी ऑक्सिजन मास्क लावूनही करता येतात. ताकदीचे व्यायाम अशक्तपणा आणि शारीरिक थकवा कमी करतात, तर एरोबिक व्यायामप्रकार हृदयाची कार्यक्षमता, रक्ताभिसरण आणि स्नायूंचे ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता वाढते. यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी नीचतम प्रमाणाच्या वर राखली जाते आणि लागणारी धाप आणि थकवा कमी होतो.
कोणत्याही फुप्फुसाच्या आजाराने ग्रस्त व्यक्तीला या व्यायामप्रकारांमुळे आरोग्यविषयक लाभ होत असला, तरी यामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी-जास्त होते आणि म्हणूनच सुरुवातीच्या काळात तरी हे व्यायामप्रकार तज्ज्ञ कार्डिओ पल्मनरी फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली करणे अतिशय आवश्यक असते. फिजिओथेरपिस्ट व्यायाम करून घेताना होणारे शारीरिक बदल आणि ऑक्सिजनची पातळी याचे सतत निरीक्षण करतात आणि योग्य प्रमाणात, कोणतेही दुष्परिणाम न होता व्यायाम देतात.
फुफ्फुसांचे अनेक आजार पूर्णपणे बरे होत नसले, तरी योग्य पुनर्वसनामुळे त्यांच्या परिणामांची तीव्रता कमी करता येते, दैनंदिन कामे अधिक सहजपणे करता येतात आणि रुग्णाचा आत्मविश्वास वाढतो. दीर्घकालीन फुप्फुसाच्या आजारांमध्ये पल्मनरी रिहॅबिलिटेशन खरंच एक ‘चैन कि साँस’ ठरते.