Akola News : अकोला जिल्हा रुग्णालयातील (Akola District hospital) एका व्हायरल व्हिडिओनंतर अकोल्यात वातावरण चांगलं संतप्त झालेय. स्ट्रेचर नसल्यामुळे एका महिलेने चक्क आपल्या पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात उपचारासाठी मदत मागितल्याचा हा व्हिडिओ होता. रुग्णालय प्रशासनाने हा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणीच्या हेतूवर शंका घेतलीय. मात्र या घटनेनंतर संतप्त झालेले शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) अकोला जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील असुविधावरून त्यांनी अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांना चांगलंच झापलय. रुग्णालयातील अनागोंदीचा जाब विचारताना बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोपही लावलेत.
Bacchu Kadu on Akola District hospital : कंपनीचे काम जरी बंद असले तरी अधिष्ठातांना कमिशन सुरू
रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे कंत्राट मिळालेल्या भाजप नेते प्रसाद लाड यांच्या कंपनीचे काम जरी बंद असले तरी अधिष्ठातांना कमिशन सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अधिष्ठाता सोनूने नागपूरचे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचेही बच्चू कडू म्हणालेत.
Akola District hospital: आरोग्य यंत्रणेच्या संवेदनेची लक्तरं वेशीवर, व्हिडीओमध्ये नेमकं काय?
अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आरोग्य यंत्रणेच्या संवेदनेची लक्तरं वेशीवर टांगल्या गेलीय का? असा संतप्त सवाल विचारला जातोय. त्याला कारण ठरलंय ते जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील असंवेदनशील आणि भोंगळ कारभाराचा व्हिडिओ. यात चक्क स्ट्रेचर नसल्याने रुग्ण पतीला पाठीवर घेऊन धावपळ करणाऱ्या महिलेला मदत मिळाली नाही. तर दुसरीकडे रुग्णालयाचा 'वार्डबॉय' तंबाखू चोळण्यात मग्न असल्याचे यात दिसून आलंय.
पाठीवर घेतलेला आजारी पती, समोर छातीशी लटकवलेली बॅग अन् मागे मागे चालत असलेली या महिलेची छोटीशी निरागस मुलगी. अन् 'ती' जीवाच्या आकांताने आपल्या पतीला उपचार मिळावा यासाठी रुग्णालयातील प्रत्येकाला कुठे मदत मिळेल हे विचारतेय. यावेळी रुग्णालयातला कोणी कर्मचारी तंबाखू चोळत असतो. तर कुणाचं तिच्याकडे लक्ष नसतंय. तिची मात्र एकच तगमग की ब्रेन स्ट्रोकमुळे अपंगत्व आलेल्या आपल्या धन्याला उपचार मिळावा. हे भयावह चित्र आहे 'विश्वगुरू' होण्याचे ढोल बडवणाऱ्या आपल्या भारत देशातलं आणि गतिशील सरकारचा दावा करणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातलं. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार आणि असंवेदनशीलतेची लक्तरं अक्षरशः वेशीवर टांगल्या गेलीयेत.
Akola News : व्हिडिओ शूट करत वस्तुस्थिती मांडणाऱ्या तरुणीवरच रुग्णालय प्रशासनाला संशय
दरम्यान, अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील या संवेदनशील आणि भोंगळ कारभाराचा व्हिडिओ चित्रित केलाय अनुराधा नाठे नावाच्या या तरुणीने. रुग्णालयाचा कारभार रोज कसा चालतो यावर भाष्य करणारा हा बोलका व्हिडिओ आहे. मात्र, हा व्हिडिओ शूट करताना रुग्णालय प्रशासनाने आपल्याला अटकाव केल्याचा आरोप या तरुणीने केलाय. यासंदर्भात 'एबीपी माझा'ने अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनूने यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या प्रकरणाचा संबंध राजकारणाशी जोडून या प्रकरणाला बगल दिली आहे.