IND A vs SL A : श्रीलंकेच्या हातात असलेला सामना 48 आणि 49 व्या षटकात फिरला, काय झालं ते जाणून घ्या
GH News June 09, 2026 10:12 PM

तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारत अ आणि श्रीलंका अ संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताची सुरूवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 16 धावांवर दोन विकेट पडल्या होत्या. पण ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माच्या खेळीमुळे 250 पार धावा झाल्या. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 277 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान श्रीलंका सहज गाठेल असंच वाटलं होतं. कारण पहिल्या विकेटसाठी टीम इंडियाला खूपच घाम गाळावा लागला. भारताला पहिली विकेट 93 धावांवर मिळाली. त्यानंतर मधल्या टप्प्यात विकेट मिळाल्या, पण सामना श्रीलंकेच्या पारड्यात झुकला होता. श्रीलंकेच्या 260 धावांवर 6 विकेट गेल्या होत्या. 18 चेंडूत 17 धावांची गरज होती. पण 48 आणि 49व्या षटकात भारताने पकड मजबूत करून हातातून गेलेला सामना खेचून आणला.

काय झालं 48व्या षटकात?

भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्माने 48वं षटक अंशुल कंबोजच्या हाती दिलं. वानुजा सहान आणि सहान अराच्चिगे या दोघांची जोडी जमली होती. या जोडीने 25 धावांची भागीदारी केली होती. तसेच सहान अराच्चिगे 74 धावांवर खेळत होता. त्यामुळे ही जोडी फोडणं आणि अराच्चिगेला बाद करण्याचं आव्हान होतं. स्ट्राईकला वानुजा होता आणि त्याने एक धाव काढून अराच्चिगेला स्ट्राईक दिली. दुसऱ्या चेंडूवर अंशुलने त्याचा त्रिफळा उडवला. व्ही वियासकांतला मैदानात आला आणि या षटकातील शेवटच्या चार चेंडूवर 6 धावा आल्या. त्यामुळे 12 चेंडूत 10 धावा आणि तीन विकेट हातात अशी स्थिती आली.

काय झालं 49व्या षटकात?

तिलक वर्माने 49वं षटक अर्शद खानच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वानुजा सहानने 1 धाव काढली आणि व्ही. वियासकांतला स्ट्राईक दिली. त्याला एलबीडब्ल्यू करण्यात अर्शद खानला यश आलं. त्यानंतर मोहम्मद शिराज मैदानात उतरला आणि पहिल्याच चेंडूवर अर्शद खानच्या डोक्यावरून मारला. वानुजा एक धाव घेण्यासाठी धावला पण ऋतुराजने हा चेंडू पकडला आणि त्याला धावचीत केलं. त्यामुळे हा सामना भारताच्या पारड्यात झुकला. श्रीलंकेला विजयासाठी 9 चेंडूत 9 धावांची गरज होती. मोहम्मद शिराज स्ट्राईकला होता आणि चौथा चेंडू निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर फटका मारताना चुकला आणि विप्रज निगमने त्याचा झेल पकडला. हा सामना भारताने 8 धावांनी जिंकला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.