Saswad water supply: सासवडला २४ तास पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; १४३ कोटींची 'वीर पाणी पुरवठा योजना' सुरू
esakal June 09, 2026 10:45 PM

​सासवड : सासवड शहराच्या भविष्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत १४३ कोटी रुपयांची नवीन 'वीर पाणी पुरवठा योजना' मंजूर करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.९) या योजनेच्या जॅकवेलच्या कामाचे वीर धरण येथे सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप आणि नगरसेवकांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

​या योजनेमध्ये पंप हाऊस, बुस्टर पंप, ६०० एमएम व्यासाची जलवाहिनी, पांगारे खिंडीत जलशुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. सासवडचे वाढते नागरीकरण लक्षात घेऊन, सन २०४० च्या लोकसंख्येच्या अनुषंगाने योजनेचे नियोजन केले असून दररोज दरडोई १३५ लीटर पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती पाणी पुरवठा सभापती ज्ञानेश्वर गिरमे यांनी दिली.

​योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे पांगारे खिंडीत २०० एमएलडी क्षमतेचा पाणी साठवण तलाव उभारला जाणार आहे. यामुळे येथून थेट शहरातील सर्व टाक्यांमध्ये पाणी पोहोचवणे शक्य होणार असून सासवडला २४ तास पाणी पुरवठा करता येईल. तत्कालीन नगराध्यक्ष चंदुकाका जगताप यांनी केलेल्या २००३ मधील वीर योजनेच्या धर्तीवरच ही नवी योजनाही यशस्वी होईल, असेही गिरमे यांनी नमूद केले. तत्कालीन आमदार संजय जगताप यांनी पाठपुरावा करून सासवड व जेजुरीसाठी या योजना मंजूर आणल्याबद्दल भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष साकेत जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी आमदार संजय जगताप यांचे आभार मानले.

​याप्रसंगी उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, राजन जगताप, प्रदीप राऊत, लिना वढणे, अर्चना जगताप, सुहास जगताप उपस्थित होते.

​"पहिल्या योजनेप्रमाणेच याही योजनेचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल. माजी आमदार संजय जगताप यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला आहे. सासवडचे झपाट्याने होणारे नागरीकरण लक्षात घेऊन भविष्यातील पिढीसाठी ही योजना वरदान ठरेल."

आनंदीकाकी जगताप, नगराध्यक्षा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.