सिद्धिविनायक मंदिर उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे करणार, 500 कोटींच्या निधीत कोणतीही टक्केवारी
Marathi June 10, 2026 12:25 AM

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराचा विकास आणि परिसराचे सुशोभीकरण उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक (Siddhivinayak Ganapati Mandir) न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दिली. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेकडून ५०० कोटी रुपयांचा निधी आरक्षित करण्यात आला असून, हा निधी थेट सिद्धिविनायक न्यासाकडे न जाता महापालिकेमार्फत विविध विकासकामांवर खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Siddhivinayak Ganapati Mandir)

सिद्धिविनायक मंदिर परिसरातील सुशोभीकरण आणि विकासकामांबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सरवणकर बोलत होते. त्यांनी सांगितले की, मंदिर परिसरातील विकासकामे टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे १०० ते १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, आरक्षित निधीतील सर्व रक्कम खर्च होईलच असे नाही.(Siddhivinayak Ganapati Mandir)

सरवणकर म्हणाले की, मंदिर परिसराच्या विकासासंदर्भात सुरू असलेल्या कामांना काही मंडळींकडून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, परिसरातील रहिवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी यापूर्वीच प्रयत्न करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळापासून या प्रकल्पाबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.(Siddhivinayak Ganapati Mandir)

Siddhivinayak Ganapati Mandir : ५०० कोटींचा निधी थेट न्यासाकडे जाणार नाही

लोकांमध्ये ५०० कोटी रुपयांचा निधी सिद्धिविनायक न्यासाला दिला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट करत सरवणकर म्हणाले की, शासन आणि महापालिकेकडून उपलब्ध करून दिलेला निधी संबंधित विकासकामांसाठी महापालिकेमार्फत खर्च केला जाईल. हा निधी थेट न्यासाच्या खात्यात जमा होणार नाही.

राज्यातील अनेक देवस्थानांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याच धर्तीवर सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या विकासासाठीही निधी उपलब्ध करण्यात आला असून, सर्व खर्च निर्धारित प्रशासकीय प्रक्रियेनुसार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Siddhivinayak Ganapati Mandir : पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार आणि बाह्य परिसराचा विकास

मुंबई महापालिकेने सुमारे ८० कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा काढल्या असून त्यासंदर्भातील वर्क ऑर्डरही देण्यात आल्याची माहिती सरवणकर यांनी दिली. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या बाहेरील परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, भव्य प्रवेशद्वार उभारण्यावर भर दिला जाणार आहे.

“मंदिरासमोर योग्य प्रवेशद्वार नसणे शोभनीय नव्हते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे,” असे ते म्हणाले.

Siddhivinayak Ganapati Mandir : पार्किंग सुविधा आणि कॉरिडॉर प्रकल्पावर भर

सिद्धिविनायक मंदिर परिसरातील मोठी समस्या म्हणजे पार्किंगची कमतरता. भाविकांना सुलभ सुविधा मिळाव्यात यासाठी पार्किंग व्यवस्थेवरही विशेष भर दिला जाणार असल्याचे सरवणकर यांनी सांगितले.

उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसराप्रमाणे सिद्धिविनायक मंदिर परिसराचाही सर्वांगीण विकास करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये भाविकांसाठी अधिक सुविधा, परिसराचे सुशोभीकरण आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा यांचा समावेश असेल.

Siddhivinayak Ganapati Mandir : ‘टक्केवारीचे आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे’

प्रकल्पावर होत असलेल्या टीकेलाही सरवणकर यांनी उत्तर दिले. “या कामातून आम्ही कोणतेही पैसे घेतले नाहीत आणि कोणीही टक्केवारी घेणार नाही. ज्यांनी आयुष्यभर टक्केवारीचे राजकारण केले त्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत,” असे ते म्हणाले. तसेच काही मंडळींचा या प्रकल्पाशी कोणताही संबंध नसताना ते आंदोलन करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Siddhivinayak Ganapati Mandir : दोन ते तीन टप्प्यांत काम पूर्ण होणार

सिद्धिविनायक मंदिर परिसरातील कॉरिडॉर आणि सुशोभीकरणाची कामे दोन ते तीन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असून पुढील टप्प्यांबाबत लवकरच महापालिका प्रशासनासोबत बैठक घेण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असली तरी काही कामे त्यापूर्वीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सरवणकर यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.