SpaceX, OpenAI आणि Anthropic चे महाकाय आयपीओ बाजारात येणार; इतिहास बदलणार का? गुंतवणुकदारांसाठी काय महत्वाचे?
ET Marathi June 10, 2026 01:45 AM
जागतिक शेअर बाजारात सध्या अशा तीन कंपन्यांच्या आयपीओंची (IPO) जोरदार चर्चा आहे, ज्या केवळ इतिहासच बदलणार नाहीत, तर संपूर्ण मार्केटची रचना बदलून टाकण्याची ताकद ठेवतात. एलॉन मस्क यांची SpaceX, सॅम ऑल्टमन यांची OpenAI आणि त्यांचीच प्रतिस्पर्धी कंपनी Anthropic हे तीनही दिग्गज सार्वजनिक बाजारात (Public Market) पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या अब्जावधी डॉलर्सच्या कंपन्यांमध्ये नेमकी कधी गुंतवणूक करावी? पहिल्याच दिवशी शेअर्स खरेदी करावेत की काही काळ वाट पहावी? हा प्रश्न सध्या जगभरातील गुंतवणूकदारांना सतावत आहे.

५५ टक्क्यांची घसरण: इतिहास काय सांगतो?सर्वसाधारणपणे नवीन आणि मोठ्या आयपीओबाबत रिटेल गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह असतो. पण इतिहास काही वेगळंच चित्र दाखवतो. 'ट्रुइस्ट वेल्थ' (Truist Wealth) या संस्थेने गेल्या १५ वर्षांतील ३० मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या आयपीओचा अभ्यास केला. या अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व मोठ्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात सूचिबद्ध (List) झाल्यानंतर पहिल्याच वर्षी सरासरी ५५% पर्यंत घसरले आहेत. आयपीओनंतरचे पहिले ६ महिने तर बहुतांश कंपन्यांसाठी नकारात्मक परतावा (Negative Returns) देणारे ठरले आहेत.

या घसरणीमागे प्रामुख्याने दोन कारणे असतात: १. कमी फ्री-फ्लोट (Low Free-Float): सुरुवातीला बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सची संख्या खूप कमी असते, ज्यामुळे किमतीत प्रचंड चढ-उतार होतात.
२. लॉक-इन कालावधी संपणे (Lock-up Expiration):
कंपनीचे सुरुवातीचे प्रवर्तक, कर्मचारी आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट यांना विशिष्ट काळासाठी शेअर्स विकण्यास बंदी असते. हा 'लॉक-इन' कालावधी संपताच बाजारात अचानक शेअर्सचा महापूर येतो. साहजिकच पुरवठा वाढल्यामुळे शेअर्सच्या किमती वेगाने खाली येतात.

तरीही हे IPO 'वेगळे' का आहेत?तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात येणारे हे तीनही आयपीओ नेहमीसारखे नसतील. हे केवळ 'मेगाकॅप' (Megacap) नसून संपूर्ण बाजाराला दिशा देणारे 'सिस्टेमिकली इम्पॉर्टंट' (Systemically Important) आयपीओ आहेत.

SpaceX: तब्बल ७५ अब्ज डॉलर्स (७. १२ लाख कोटी) उभारण्याच्या तयारीत असलेली ही कंपनी जगातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकते. बाजारात आल्यानंतर तिचे एकूण मूल्यांकन जवळजवळ $१. ८ ट्रिलियन (१७१ लाख कोटी) असेल.

Anthropic: खासगी फंडिंग फेऱ्यांमध्ये या एआय (AI) कंपनीचे मूल्यांकन ९६५ अब्ज डॉलर्सच्या (९१. ६७ लाख कोटी) घरात गेले आहे.

OpenAI: चॅटजीपीटी (ChatGPT) बनवणारी ही कंपनी सुद्धा सुमारे ८५२ अब्ज डॉलर्सच्या (८०. ८४ लाख कोटी) मूल्यांकनासह बाजारात उतरत आहे.

थोडक्यात सांगायचे तर, हे तीनही आयपीओ सूचिबद्ध झाल्यावर प्रत्येकी १ ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास किंवा त्याहून अधिक मूल्यांकन गाठतील. सध्या अमेरिकेच्या अग्रगण्य 'S&P 500 Index' मधील फक्त ११ कंपन्यांचे मूल्यांकन १ ट्रिलियन डॉलर्सच्या (९५ लाख कोटी) वर आहे. यावरून या तीन कंपन्यांच्या अवाढव्य आकाराची कल्पना येऊ शकते.

११९० च्या 'डॉट-कॉम' बुडबुड्याची भीती?सध्या बाजारात ज्या गतीने हे एआय आणि टेक आयपीओ येत आहेत, त्यामुळे अनेक जुन्या जाणकारांना १९९० च्या दशकातील 'डॉट-कॉम बबल' (Dot-com Bubble) ची आठवण येत आहे. त्या काळात 'इंटरनेट' नावाचा शब्द असलेल्या प्रत्येक कंपनीवर पैशांचा पाऊस पाडला जात होता. पण नंतर जेव्हा लॉक-इन संपले आणि सुरुवातीच्या गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरू केली, तेव्हा बाजार पत्त्यासारखा कोलमडला.

फ्रँकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मॅक्स गोखमन यांच्या मते, "जेव्हा कर्मचारी आणि सुरुवातीचे व्हेंचर इन्व्हेस्टर्स आपली संपत्ती रोख करण्यासाठी (Cash out) शेअर्सची विक्री सुरू करतील, तेव्हा बाजारावर विक्रीचा प्रचंड दबाव येईल. पण त्याआधी, बाजारात एक मोठी तेजी (Melt-up) देखील पाहायला मिळू शकते, जी मोठ्या घसरणीचा पूर्वसंकेत असू शकते."

भूतकाळातील तीन मोठ्या उदाहरणांवरून धडा घ्या

१. मेटा प्लॅटफॉर्म्स (Meta Platforms - पूर्वीचे फेसबुक):२०१२ मध्ये जेव्हा फेसबुकचा आयपीओ $३८ वर आला, तेव्हा पहिल्याच दिवशी तो सपाट बंद झाला. पुढील १२ महिन्यांत हा शेअर ३०% पेक्षा जास्त घसरला. मात्र, ज्यांनी संयम ठेवला त्यांना आज १४००% पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. म्हणजेच पहिल्या दिवशी खरेदी न करता ६ महिन्यांनी खरेदी करणाऱ्यांना अधिक फायदा झाला.

२. टेस्ला (Tesla):जून २०१० मध्ये एलॉन मस्क यांच्या टेस्लाचा आयपीओ आला. सुरुवातीचे काही महिने हा शेअर एकाच जागी रेंगाळत होता. पहिल्या वर्षाच्या शेवटी तो जरी १८% वर असला, तरी S&P 500 इंडेक्सपेक्षा त्याची कामगिरी खराब होती आणि तो आपल्या उच्चांकापेक्षा खूप खाली ट्रेड करत होता. आज हा शेअर २५,०००% पेक्षा जास्त वाढला आहे, पण सुरुवातीचा प्रवास अत्यंत खडतर होता.

३. कोरवीव्ह (CoreWeave):मार्च २०२५ मध्ये आलेल्या या क्लाउड कंप्युटिंग कंपनीचा आयपीओ आधी लहान करावा लागला होता. एनव्हिडिया (Nvidia) सारख्या दिग्गज कंपनीने आधार दिल्यामुळे हा आयपीओ पार पडला. जून २०२५ पर्यंत या शेअरने ४००% ची गगनभरारी घेतली, पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत याने आपली अर्धी कमाई गमावली. सध्या हा शेअर त्याच्या सर्वोच्च शिखरावरून ४४% खाली व्यवहार करत आहे.

कंपन्यांचे कामकाज गुंतवणूकदारांसाठी यशाचा गुरुमंत्र काय?नॉर्थवेस्टर्न म्युच्युअल वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य पोर्टफोलिओ व्यवस्थापक मॅट स्टकी अतिशय मोलाचा सल्ला देतात. ते म्हणतात, "गुंतवणूकदारांना गुगल (Google) किंवा फेसबुकमधून (Facebook) पैसे कमवण्यासाठी पहिल्याच दिवशी आयपीओ खरेदी करण्याची गरज पडली नव्हती. जर तुम्ही पहिल्या दिवशी शेअर्स खरेदी केले नाहीत, याचा अर्थ असा नाही की तुमची संधी हुकली. आयपीओनंतर ६ महिने किंवा एका वर्षाने जेव्हा बाजारातील अस्थिरता शांत होते, तेव्हा खरेदी करणे हा नेहमीच एक सुज्ञ आणि कमी जोखीम असलेला पर्याय असतो."
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.