Akola Hospital Case: अकोला सर्वोपचार रुग्णालय प्रकरण मंत्रालयात; आमदार साजिद खान पठाण यांची तक्रार
esakal June 10, 2026 01:45 AM

श्रीकांत राऊत

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी फिरणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. आमदार साजिद खान पठाण यांनी मंगळवारी (ता.९) मुंबई येथे जाऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या जनक्षोभाची दखल राज्य शासनाने घेतली असून चौकशी प्रक्रियेला वेग आला आहे. घटनेतील सर्व बाबींची पडताळणी करण्यासाठी चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. आमदार साजिद खान पठाण यांनी मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. एका बाजूला व्हिडिओतील दृश्यांवरून आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप नाकारत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे चौकशी अहवालातून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रशासनाने आरोप फेटाळले

व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे राज्यभरात चर्चा सुरू असताना दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणावर अधिकृत खुलासा करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, संबंधित रुग्णाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत नाकारण्यात आलेली नव्हती. तसेच व्हिडिओच्या आधारे होत असलेल्या अनेक दाव्यांमध्ये वस्तुस्थितीपेक्षा वेगळे चित्र निर्माण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

सर्वोपचार रुग्णालयात घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली आहे. येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा उचलणार आहे.

- साजिद खान पठाण, आमदार, अकोला पश्चिम

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.