FDA Action: बेकायदेशीर औषधव्यवसायावर एफडीएचा धडाका; पुणे-कोल्हापुरात २५ लाखांचा साठा जप्त
esakal June 10, 2026 01:45 AM

पुणे : आरोग्याशी तडजोड करणाऱ्या बेकायदेशीर औषध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून एकूण २४ लाख ८१ हजार रुपयांचा औषधसाठा जप्त केला आहे. यामध्ये कोल्हापुरात परवान्याविना साठविण्यात आलेली औषधे, तर पुण्यात नामांकित औषध कंपनीच्या गोदामातून ‘शेड्यूल एच’ वर्गातील औषधांचा साठा जप्त करण्यात आला.

एफडीएने सोमवारी (ता. ८ ) कोल्हापूर येथील मे. मेडटॅब्स फार्मा प्रा. लि. येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर अ‍ॅलोपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविक इंजेक्शनचा साठा आढळून आला. संबंधित कंपनीकडे औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक परवाने आणि वैध कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत या प्रकरणात १३ लाख ६२ हजार १४७ रुपयांचा २९ प्रकारच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील वडकी येथील मे. सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ‘रेक्टीन प्लस टॅब्लेट’ या ‘शेड्यूल एच’ औषधाच्या पॅकेजिंगवर औषधाच्या वापराबाबत जाहिरात करण्यात आल्याचे आढळले. अशा प्रकारची जाहिरात औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम १९४५ मधील तरतुदींशी विसंगत असल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित औषधांचा सुमारे ११ लाख १९ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

‘एफडीए’चे नागरिकांसाठी निवेदन

–नागरिकांनी औषधे केवळ अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत

– संशयास्पद औषधविक्री किंवा बेकायदेशीर साठ्याची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी

– औषध उत्‍पादक व विक्रेते यांनी कायदे व नियमांचे पालन करावे

‘‘राज्यात औषध उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री क्षेत्रातील कोणतीही बेकायदेशीर बाब खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहील.’’

– तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्‍ट्र

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.