पुणे : दापोडी आणि हडपसर परिसरात विषारी हातभट्टीची दारू सेवन केल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणात आणखी सुमारे २० आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने पाच विशेष पथके नियुक्त केली आहेत.
विषारी हातभट्टीची दारू सेवन केल्याने २३ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दापोडी आणि हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील ११ आरोपींना न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाईल आणि इतर तांत्रिक पुरावे न्यायवैद्यक तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच या उपकरणांच्या क्लोन कॉपी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, सर्व आरोपींच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड (आयपीडीआर) यांचे विश्लेषण करण्यात येत आहे. तपास यंत्रणा या माध्यमातून दारू उत्पादन, वाहतूक आणि वितरणाच्या साखळीचा शोध घेत आहे.
दोन मदत केंद्रे सुरू -
घटनेबाबत कोणाकडेही माहिती असल्यास ती गुन्हे अन्वेषण विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी दापोडी आणि हडपसर येथे दोन मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
दापोडी येथील मदत केंद्र जुना पुणे-मुंबई रस्ता, दापोडी पोलिस चौकी येथे असून पोलीस उपअधीक्षक सचिन चव्हाण (मोबाईल क्रमांक ९०११३३४५८०) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. हडपसर येथील मदत केंद्र महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ४, भाजी मंडईजवळ कार्यरत असून पोलिस उपअधीक्षक शामराव काळे (८२३७२२९२०८) हे संपर्क अधिकारी आहेत.
या गुन्ह्यांचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ आणि पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सचिन चव्हाण आणि शामराव काळे करीत आहेत.