वेल्हे : आंबवणे (ता.राजगड) येथील 35 वर्षीय विवाहित बेपत्ता महिलेचा मृतदेह गुंजवणी नदीमध्ये मंगळवार (ता.०९) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मिळून आला असल्याची माहिती वेल्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली.
मीरा सुनील ननावरे( वय.35) रा.आंबवणे,ता.राजगड जि.पुणे असे महिलेचे नाव असून वेल्हे पोलीस ठाण्यात गेल्या दोन दिवसांपासून ही विवाहित महिला बेपत्ता असल्याबाबतची तक्रार सोमवार (ता.०८) रोजी दाखल करण्यात आली होती.
याप्रकरणी मृत महिलेचे पती सुनील लक्ष्मण ननावरे यांनी खबर दिली होती. मृत्यूचे अद्याप कारण समजले नसल्याने शवविच्छेदनानंतर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वांगणी गावच्या पाणीपुरवठ्याची मोटर दुरुस्ती करण्यासाठी गुंजवणी नदी पात्रात आंबवणे गावच्या हद्दीमध्ये पाण्यामध्ये महिलेचा मृतदेह तरंगताना करंजावणे गावचे पोलीस पाटील संजय शिंदे यांना दिसून आला या संदर्भात वेल्हे पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी राजगड, हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमला संपर्क केला संपर्क केल्यानंतर टीमचे सदस्य तानाजी भोसले , वैभव भोसले, संदीप सोलस्कर, संजय चोरगे ,उत्तम पिसाळ, विक्रम बिरामणे, घटनास्थळी दाखल होत नदीपात्राच्या मध्यभागी तरंगणारा मृतदेह नदीच्या कडेला काढण्यात आला. नदीच्या कडेला मृतदेह काढल्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी महिलेची ओळख पटवली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याची माहिती अधिकारी किशोर शेवते यांनी दिली . घटनास्थळी गोपनीय विभागाचे आकाश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल आवदे उपस्थित होते.