Shirur APMC Polls: शिरूर बाजार समिती निवडणूक : १८ जागांसाठी २६७ उमेदवारी अर्ज वैध, दिग्गजांचे अर्ज बाद
esakal June 10, 2026 02:45 AM

शिरूर : शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज छानणीनंतर आता २६७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले असून, उमेदवारी अर्ज माघारीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल, अशी राजकीय स्थिती आहे. दरम्यान, उमेदवार अर्ज छानणीमध्ये नगरसेवक, सोसायटीच्या अध्यक्षासह माजी सरपंचांचे अर्ज बाद झाले असताना, हमाल - मापाडी मतदार संघातील मात्र सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

शिरूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी पाच जुलै रोजी निवडणूक होत आहे. यासाठी दाखल झालेल्या एकूण तीनशे उमेदवारी अर्जांची छानणी शुक्रवारी (ता. ५) येथील प्रशासकीय कार्यालयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरूर बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांच्या उपस्थितीत झालेल्या छानणी प्रक्रियेदरम्यान, अनेक प्रतिस्पर्ध्यांनी परस्परविरोधात आक्षेप नोंदवित उमेदवारी अर्जांवर हरकती घेतल्या होत्या. हरकतींची शहानिशा व सुनावणीनंतर एकूण ३३ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. शिरूरचे नगरसेवक संतोष थेऊरकर, अण्णापूरचे माजी सरपंच किरण झंजाड, राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन थोरात, कान्हूर सोसायटीचे माजी अध्यक्ष दीपक तळोले, तर्डोबावाडीचे माजी उपसरपंच पांडुरंग पाचर्णे यांच्यासह अनेक आजी - माजी पदाधिकारी व राजकीय धुरीणांचे अर्ज अवैध ठरले. या पार्श्वभूमीवर हमाल - मापाडी मतदार संघातून दाखल झालेले सर्व पाच अर्ज वैध ठरले आहेत. दहा गुंठे जागेचा सातबारा नसणे, सूचक किंवा अनुमोदक नसणे यासह उमेदवार अर्जावर सही नसणे किंवा चुकीची असणे या कारणास्तव हे अर्ज बाद ठरविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय कार्यालयाकडून कळविण्यात आले.

छानणीनंतर सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातील खूल्या जागांसाठी ११८, महिला प्रवर्गातून २२, इतर मागास प्रवर्गातून ३४, विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून १६ तर ग्रामपंचायत मतदार संघातील खूल्या जागांवर ३१, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून १०, आर्थिक दूर्बल घटक प्रवर्गातून १४ तसेच व्यापारी आडते मतदार संघातून १७; तर हमाल मापाडी मतदार संघातून पाच असे एकूण २६७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

१८ जागांसाठी २६७ उमेदवारी अर्ज वैध ठरले असले; तरी उमेदवारी अर्ज माघारीनंतरच या निवडणूकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. २२ जून पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून, त्या मुदतीपर्यंत राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी परस्परांवर दबाव, मनधरणी पासून ते बडे मासे आपल्या गळाला लावण्यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न होणार असल्याने पुढील आठवडाभर तालुक्याच्या राजकारणात कमालीची रंगत भरण्याची शक्यता आहे. आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, माजी आमदार अशोक पवार यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे हे राजकीय सावधानता बाळगून चाचपणी करीत आहेत. आमदार कटके यांना घेरण्यासाठी माजी आमदार पवार यांच्यासह विरोधक एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात असून, त्यादृष्टीनेही डावपेच आखले जात आहेत.

शिरूर बाजार समितीच्या निवडणूकीत अनेक राजकीय धुरीण व दिग्गजांचे उमेदवारी अर्ज बाद झाले असताना हमाल मापाडी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले बाजार समितीचे माजी संचालक बंडू खंडू जाधव यांच्यासह मुक्ता खंडू गुलदगड, नीलेश सुरेश दसगुडे, बाळासाहेब नानासाहेब कर्डिले व संदीप विठ्ठल दसगुडे या सर्वांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याचबरोबर आर्थिक दूर्बल घटक मतदार संघातून अनेक पैसेवाले व बड्या पदाधिकाऱ्यांनी आलिशान मोटारींतून येऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.