पुणे : गणेशोत्सव काळात पुण्यात (Pune) डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन सध्या जोरदार वादंग उठला आहे. तसेच, महापालिकेच्या बैठकीनंतर व्हायरल झालेले विद्यानंद बापट हेही चांगलेच चर्चेत असून सोशल मीडियातही व्हायरल झाले आहेत. विविध न्यूज चॅनेल्सला मुलाखती देत त्यांनी आपण नास्तिक असल्याचं सांगितलं, तर प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे, पण सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी देखील घेणे आवश्यक असल्याचं ते सांगतात. आता, तुम्ही पुण्याच्या गणेशोत्सवावर (Ganeshotsav) बोलू नका असे म्हणत या विद्यानंद बापटांना नक्षली मानसिकतेचा व्यक्ती अशी टीका करण्यात आली आहे. त्यामुळे, नारायण पेठेतील बापट यांना आता सदाशिव पेठेच्या महाजन आणि कोथरूडच्या कुलकर्णींनी आव्हान दिलंय.
विद्यानंद बापट यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून एक तापट बापट म्हणत त्यांच्या मागण्यांचं समर्थन करणाराही मोठा वर्ग पुणे शहरात एकत्र येत आहे. डीजे आणि ध्वनीप्रदुषणमुक्त गणेशोत्सवाची मागणी करत अनेक पुणेकर एकत्र येत आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुणेकरांनी सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करुन दाखवून द्यावं, असे म्हटले. तसेच, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी देखील पुण्यात गणेशोत्सव काळात डीजे वाजवू नये, ध्वनीप्रदुषण करू नये, लेझरचा वापर टाळावा, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, अशा शब्दात इशाराच दिलाय. त्यातच, हा मुद्दा उचलून धरणाऱ्या बापटांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता पुण्यातूनच करण्यात आलीय.
विद्यानंद बापट हा एक अराजकवादी मानसिकतेचा नक्षली आहे, असा गंभीर आरोप पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनी केलाय. समाजात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. डी.जे.बाबत बोलत होते तिथपर्यंत ठीक होतं पण त्यांनी पुण्याच्या गणेशोत्सवाबाबत बोलू नये, आम्ही सुद्धा सदाशिव पेठेत राहायला आहोत, आम्हाला सुद्धा आवाजाचा त्रास होतो पण त्यांनी मुद्दा सोडून इतर गोष्टींवर बोलू नये, असे मत शशांक महाजन यांनी व्यक्त केलंय. तर, विद्यानंद बापट यांच्या विरोधात धनंजय कुलकर्णी उद्या पोलिसात तक्रार देणार आहेत, असेही त्यांनी म्हटलं.
पुण्यातील ऐतिहासिक गणेशोत्सवातील डीजे (DJ) आणि कर्णकर्कश ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. डीजेच्या दणदणाटाविरोधात आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सातत्याने लढा देत असताना, आता आणखी एका पुणेकराने या गंभीर प्रश्नावर थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) दरवाजे ठोठावले आहेत. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेत आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.