Latest Maharashtra News Live Updates : पॅरासिटामॉल सह ५० औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी
esakal September 27, 2024 07:45 AM
Raksha Khadse Live Updates: केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली बुद्धिबळ भारतीय संघाची भेट

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधे ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली भेट.

Central Drugs Standard Control Live Updates: सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालात पॅरासिटामॉल सह ५० औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरली.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालात पॅरासिटामॉल सह ५० औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरली. सीडीएससीओने पॅरासिटामॉलच्या अनेक गुणधर्मांची चाचणी केली आणि त्यात कॅल्शियम, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठी आवश्यक असलेल्या अनेक औषधांचा समावेश होता

Arvind Kejariwal Live: 10 कोटींच्या खंडणी प्रकरणी सुकेश चंद्रशेखरने वाढवणार केजरीवालांच्या अडचणी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल नुकतेच जामिनावर तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ते तुरुंगात होते. मात्र, तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या इतर नेत्यांसमोर आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.

ठग सुकेश चंद्रशेखरने केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांवर 10 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला होता. आता या प्रकरणी सीबीआयने तुरुंगात सुकेशचा जबाब नोंदवला आहे.

EY Employee Live: कामाच्या दबावामुळे जीव गमावलेल्या EY कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची शशी थरूर यांनी घेतली

पुण्यातील बहुराष्ट्रीय अर्न्स्ट अँड यंग (ENY) च्या 26 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटचा कामाच्या दबावामुळे मृत्यू झाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. या घटनेपासून मोठ्या व्यावसायिक कंपन्यांमधील कामाचा ताण आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी बुधवारी मृत अण्णा सेबॅस्टियन पेरिले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

PM Modi Live: सुवर्ण कामगिरी करणाऱ्या बुद्धिबळपटूंची पंतप्रधानांनी घेतली भेट

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधे ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी संवादही साधला.

Mumbai Live : मुंबईतल्या सहा जागांवरुन महाविकास आघाडीत तिढा

मुंबईतल्या सहा जागांवरुन महाविकास आघाडीत तिढा असल्याचे म्हटले जात आहे. भायखळा, अणुशक्ति नगर, वर्सोवा, वांद्रे पश्चिम, कुर्ला आणि चेंबूर या जागांवर वाद होण्याची शक्यता आहे.

Solapur live : कुरनूर धरण १००% भरले

अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी असलेले कुरनूर धरण १००% भरले आहे. सतत पडणारा परतीचा पाऊस आणि एकरुख योजनेच्या माध्यमातून उजनी धरणातून येत असलेल्या पाण्यामुळे धरण भरले आहे.

Ratnagiri Live: रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा आँरेज अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

Kolhapur Murder Update : कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात तरुणाची हत्या

कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात तरुणाची हत्या करण्यात आली आहे, संदीप शिरगावे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Pooja Khedkar Live: ४ ऑक्टोबर पर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम

४ ऑक्टोबर पर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम आहे. पूजा खेडकरला तोपर्यंत अटक करता येणार नाही

Pooja Khedkar: पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू

पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली आहे. पूजा खेडकरला अटकपूर्व जामिनासाठी दिलासा मिळत आहे हे गंभीर असा दावा UPSC च्या वकिलांनी केली आहे.

Senthil balaji Live : तमिळनाडूचे माजी मंत्री सेंथील बालाजी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

तमिळनाडूचे माजी मंत्री सेंथील बालाजी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. १४ जून २०२३ रोज़ी बालाजी यांना अटक झाली होती. ED कडून त्यांना अटक करण्यात आली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना अटक झाली होती.

Sanjay Raut Live: शिवसेना खासदार संजय राऊत आज रात्री दिल्लीत येण्याची शक्यता

शिवसेना खासदार संजय राऊत आज रात्री दिल्लीत येण्याची शक्यता आहे. उद्या दिल्लीतील काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संजय राऊत भेटी घेणार असल्याची माहिती आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मलिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन जागावाटप बद्दल चर्चा केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटातील नेते खासदार संजय राऊत सुद्धा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जागावाटपवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

Amit Shah Live: संभाजीनगरमध्ये अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज मुंबईत पुन्हा बैठक

संभाजीनगरमध्ये अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज मुंबईत पुन्हा बैठक होणार आहे. महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची आज रात्री बैठक होईल. तिन्ही घटक पक्षाचे मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत महायुतीची बैठक झाली त्यात ९० जागांवर तिढा आहे त्यावर आजच्या चर्चा होणार आहे. या आजच्या बैठकीतील माहिती अमित शहा यांना मुंबईच्या दौऱ्यावेळीस देण्यात येणार आहे. महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीच्या मुहूर्तावर जाहीर होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi Live: राहुल गांधी येत्या 5 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या 5 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. गांधी यांच्या या दौऱ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश काँग्रेसला नवी ऊर्जा मिळणार आहे. त्यामुळे राहुल यांचा हा दौऱ्या महत्त्वाचा मानला जातो.

PM Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा एस पी कॉलेज ला होणार का नवीन ठिकाणी होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा एस पी कॉलेज ला होणार का नवीन ठिकाणी होणार? याबाबत दुपारी बारा वाजता अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. गणेश कला क्रीडा रंग मंच मोदींच्या सभेसाठी पर्यायी स्थळ म्हणून निवडण्यात आले आहे. दुपारी बारा वाजता एसपीजी, जिल्हा प्रशासन कोर कमिटी तसेच पोलीस यांच्यात अंतिम बैठक होणार आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. गणेश कला क्रीडा रंग म्हणजे या ठिकाणची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

Vishwajit Kadam LIVE : काँग्रेस नेते विश्वजित कदम सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

काँग्रेस नेते विश्वजित कदम सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अशी अचानक भेट घेण्याचं कारण समजू शकले नाही, पण या भेटीच्या वृत्ताने राजकीय तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.

Rajiv Gandhi National University LIVE : पटियालामधील राजीव गांधी विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच

पंजाब: पटियाला येथील राजीव गांधी राष्ट्रीय विधी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. कुलगुरू जय शंकर सिंह यांनी वसतिगृहातील महिलांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Gangapur Dam LIVE : गंगापूर धरणातून 553 क्यूसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा पुन्हा विसर्ग

- सकाळी ८ वाजता धरणातून ५५३ क्यूसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्यानं पाण्याचा विसर्ग

- पावसाचा जोर वाढल्यास धरणातून टप्प्या टप्प्याने पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार

- नाशिकला आज पावसाचा रेड अलर्ट असल्याने यंत्रणा अलर्टवर

- धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास नाशिकमध्ये पुन्हा गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Central Railway CPRO LIVE : मुंबईत सर्व लोकल ट्रेन सुरळीत सुरू

मुंबई : सर्व लोकल ट्रेन सुरळीत सुरू असून मुख्य मार्गावरील गाड्या वेळापत्रकानुसार 3-4 मिनिटे उशिरा धावत आहेत. पावसाबाबत सावधानता म्हणून हा निर्णय घेत असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Bhogavati Sugar Factory LIVE : भोगावती साखर कारखान्याची उद्या सर्वसाधारण सभा

राशिवडे बुद्रुक : भोगावती साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.२७) दुपारी एक वाजता होत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या साखर कारखान्याच्या पुढील हंगामासंदर्भात धोरण आणि भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीतबाबत या सभेमध्ये चर्चा रंगण्याची शक्यता आहे. याकडे कार्यक्षेत्रातील सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.

Rahul Gandhi LIVE : काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या पाच ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या पाच ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. श्री. गांधी कोल्हापुरात होणाऱ्या ‘संविधान सन्मान संमेलनात’ विविध सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी संघटनेसोबत संवाद साधतील.

Ladki Bahin Yojana LIVE : 'लाडक्या बहिणीं'ना तिसरा हप्ता मिळणार 30 सप्टेंबरला

कोल्हापूर : लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता ३० सप्टेंबरला जमा होणार आहे. जिल्ह्यात नऊ लाख ९१ हजार ५५३ लाभार्थी आहेत. त्यापैकी एक लाख ११ हजार बहिणींची आधारसोबत बॅंक सिडिंग प्रक्रिया न झाल्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Juhu Police Case : चोर असल्याच्या संशयातून दोन अल्पवयीन मुलांची निर्वस्त्र धिंड

चोर असल्याच्या संशयावरून दोन अल्पवयीन मुलांना रात्रभर बांधून ठेवत, मारहाण करत केस भादरून परिसरातून विवस्त्र धिंड काढल्याचा गंभीर प्रकार विलेपार्ले पश्चिमेकडील जुहू परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी सूरज पटवा याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Local LIVE : मुसळधार पावसानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू, 5-10 मिनिट उशिराने धावताहेत लोकल

काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झालीये. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल ५-१० मिनिट उशिराने धावत आहेत. सध्या कोणत्याही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

Weather Alert LIVE : कोकण, मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता

पुणे : राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला आहे. आजही (ता. २६) पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.

PM Modi LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, काय आहे कारण?

Latest Marathi Live Updates 26 September 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान धावणाऱ्या मेट्रो रेल्वेला मोदी सायंकाळी हिरवा झेंडा दाखवतील. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपले सहावे उपोषण नऊ दिवसांनंतर स्थगित केले. तसेच ओबीसीं’चे आरक्षण अबाधित राहावे, ‘ओबीसीं’मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, आदी मागण्यांसाठी प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनीही आपले बेमुदत उपोषण स्थगित केले. राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला आहे. आजही पावसाची शक्यता आहे. सोन्याच्या भावात जोरदार वाढ झाली असून, सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ७५ हजार रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.