दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांत 'पांढऱ्या सोन्या'ची क्रेझ
esakal September 27, 2024 08:45 AM

राजेगाव, ता. २६ : शेती सिंचनासाठी भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे दौंडच्या पूर्व भागातील शेतकरी उसाचे मोठे उत्पादन घेत असे. मात्र, परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये तो पांढरं सोनं ठरणाऱ्या कापसाच्या उत्पादनास पसंती देत आहे.

सरकारकडून चांगल्या कापसाला प्रतिक्विंटल ७५३० हमीभाव मिळतो. त्यात गेल्या वर्षीच्या ४३० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे हे पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीने आर्थिक फायदा देणारे बनले असून पांढऱ्या सोन्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

दौंड तालुक्यात मागील चार वर्षांपासून कापूस लागवडीसाठीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, लागवडीचा सातत्याने आलेख वाढत आहे. यंदा तालुक्यात १०६६ हेक्टरवर लागवड झाली आहे. पाहिलं तर कोरडवाहू जमिनीत पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात घेतले जाणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते.


* पाण्याची उपलब्धता असल्याने मेच्या अखेरीसच कापूस लागवड
* चार महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी कापूस वेचायला सुरवात
* कापसाचे दोन महिन्यात साधारणपणे चार वेळा तोडे होतात
* एकरी १५ क्विंटल उत्पन्न मिळते.
* औषध फवारणी दोन वेळा तर खुरपणी दोन वेळा केली जाते.
* कापूस निघाल्यानंतर त्याच क्षेत्रात त्यानंतर गहू, कांदा, उसाचे उत्पादन

विक्री केंद्राअभावी नगरमध्ये विक्री
दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवला जातो. परंतु तालुक्यात अद्यापही खरेदी विक्री केंद्राची स्थापना झाली नसल्याने कापूस विक्रीसाठी पूर्व भागातील शेतकरी शेजारील नगर जिल्ह्यामध्ये मिरजगाव येथे घेऊन जातो.


यंदा काही प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार असलेली काळी कसदार मृदा, ऊस, गहू आणि कांदा पिकाला होणारा बेवड आणि एकरी लागवडीपासून मिळणारे चांगले उत्पन्न यामुळे गेल्या काही वर्षांपासून कापसाचे क्षेत्र तालुक्यामध्ये वाढतच चालले आहे.
- राहुल माने, तालुका कृषी अधिकारी, दौंड

कमी कालावधीत अधिक आर्थिक लाभ देणारे पीक म्हणून कपाशी पिकाकडे पाहिले जाते. आडसाली उसासाठी तब्बल १८ ते २० महिने कालावधी लागतो. त्यापेक्षा सहा महिन्यात कपाशीचे पीक येते. शिवाय कापूस निघाल्यानंतर त्याच क्षेत्रात त्यानंतर गहू, कांदा, ऊस ही पिके घेतली जातात.
- शरद जगताप, कापूस उत्पादक शेतकरी, राजेगाव ता. दौंड.

00419, 00420, 49364

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.