अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना पाळल्या नाही, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारवर ताशेरे
सोमेश कोलगे September 27, 2024 09:13 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह निवडणुका होणाऱ्या इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहित एकाच जागी 3 वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण आयोगाच्या पत्राकडे मुख्य सचिवांनी दुर्लक्ष केल्याने आयोगाने नाराजी व्यक्त केली. 

राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या कालावधीत या सगळ्याची माहिती का दिली नाही हे स्पष्ट करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही राज्य सरकारकडून कुठलही उत्तर न आल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले. 

मुंबईतील मतदान केंद्रावरील गैरसोयींबद्दल नाराजी

राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत आढावा बैठकीदरम्यान लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मुंबई शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांना झालेल्या गैरसोयीबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे.

मतदान केंद्रांवर बेंच, पंखे, पिण्याचे पाणी, शेड अशा सर्व किमान सुविधांची खात्री करण्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. पण तसे अनेक मतदान केंद्रावर झाले नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. मतदानाच्या दिवशी मतदारांच्या गैरसोयीच्या तक्रारीवर आयोग आता कठोरपणे कारवाई करणार आहे. 

मतदान केंद्रांवर रांगांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच सध्या प्रलंबित असलेल्या रिक्त ARO च्या जागा भरल्या जातील याची खात्री करण्याच्या राज्याच्या मुख्य सचिवांना सूचना देण्यात आल्या.

केंद्रीय निवडणूक आयोगाची शनिवारी पत्रकार परिषद 

राज्याचे पोलीस महासंचालक,मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहितेबाबत भाष्य केले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दोन किंवा तीन टप्प्यात घेतली जाईल, अशा चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्राची निवडणूक किती टप्प्यात होणार? हे शनिवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.