नेपाळमध्ये महापुरात 60 जणांचा मृत्यू, अमेरिकेत हेलन चक्रीवादळामुळे 52 मृत्यूमुखी
जयदीप मेढे September 29, 2024 05:13 PM

Nepal  Flood | Helene Cyclone In America : नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे 60 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते बिश्वो अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी 34 मृत्यू काठमांडू खोऱ्यात झाले आहेत. 226 घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. लोकांना वाचवण्यासाठी 3000 सैनिक तैनात करण्यात आले आहेत. ज्यांनी आतापर्यंत हजारो लोकांची सुटका केली आहे. मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये 44 ठिकाणी महामार्ग रोखण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीत अडचणी येत आहेत. नेपाळमधील अनेक भाग शुक्रवारपासून पावसाने जलमय झाले आहेत, त्यामुळे आपत्ती अधिकाऱ्यांनी अचानक पूर येण्याचा इशारा दिला आहे. या काळात हजारो लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.

कोसी नदी 56 वर्षांनंतर विक्रम मोडणार

नेपाळच्या पायथ्याशी आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नेपाळला लागून असलेल्या बिहारमधील गंडक आणि कोसी नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. लोकांना नद्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नेपाळमधील पावसामुळे कोसी नदी 56 वर्षांनंतर विक्रम मोडणार आहे. शनिवारी नेपाळमधूनही 5 लाख 93 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गंडक बॅरेजमधील पाणी पाच लाख क्युसेकवर पोहोचणार आहे. गंडक परिसरातील सखल भागातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बगहा, बेतिया, गोपालगंज, छपरा आदी जिल्ह्यांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. बिहारचे दु:ख म्हणून ओळखली जाणारी कोसी नदी तिबेटमधून उगम पावते आणि चीन आणि नेपाळमार्गे भारतात पोहोचते.

अमेकित हेलन चक्रीवादळामुळे आतापर्यंत 52 लोकांचा मृत्यू

दुसरीकडे, अमेरिकेत शुक्रवारी (27 सप्टेंबर) आलेल्या हेलन चक्रीवादळामुळे आतापर्यंत 52 लोकांचा मृत्यू झाला आहे, अमेरिकन मीडिया हाऊस सीएनएनच्या मते, वादळामुळे आलेल्या पुरात अनेक घरे वाहून गेली आहेत. चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव दक्षिण कॅरोलिना आणि जॉर्जियामध्ये दिसून आला जेथे श्रेणी 4 च्या वादळामुळे 34 लोकांचा मृत्यू झाला. पाचही राज्यांमध्ये वादळामुळे अनेक लोक अडकले असून, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर कॅरोलिनामध्ये काही ठिकाणी भूस्खलनही झाले. लोकांना वाचवण्यासाठी येथे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. या काळात रुग्णालयाच्या छतावरून 59 जणांची सुटका करण्यात आली. अमेरिकेतील वादळामुळे 45 लाख लोकांच्या घरात वीजपुरवठा नाही. फ्लोरिडामध्ये बचाव कार्यासाठी 4 हजार नॅशनल गार्ड्समन तैनात करण्यात आले आहेत.

वादळामुळे 2.51 लाख कोटी रुपयांचे नुकसान

फायनान्शियल कंपनी मूडीजने म्हटले आहे की, हेलन चक्रीवादळामुळे अमेरिकेचे 2 लाख 51 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, मेक्सिकोच्या आखातातून फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर धडकलेले हे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली वादळ आहे. हे अमेरिकेच्या इतिहासातील 14 सर्वात धोकादायक वादळांपैकी एक आहे. याआधी शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 1 कोटी 20 लाख लोकांना वादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे १ हजार उड्डाणे रद्द करण्यात आली. राज्य आपत्कालीन सेवेने म्हटले आहे की येत्या दोन ते तीन दिवसांत 5 कोटी लोकांना याचा फटका बसू शकतो.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.