नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच आता नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात (Nashik East Assembly Constituency) महायुती आणि महाविकास आघाडीत वाद चिघळल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून नाशिक पूर्व मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून भाजपने विद्यमान राहुल ढिकले यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गणेश गीते निवडणुकीच्या रिंगणात आहे. सुरुवातीला या मतदारसंघात डमी उमेदवार उभा केल्याचा आरोप गणेश गीते यांनी केला होता. या पाठोपाठ आज भारतीय जनता पक्षाची रॅली सुरु असताना गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप सुरु असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर राहुल ढिकले यांचे कार्यकर्ते गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांच्या इथे पोहोचले. यानंतर दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांचे कार्यकर्ते पैशांचे वाटप करत असल्याचा आरोप केलाय. तर गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला करण्यात आला. आमच्या गाड्या फोडल्या, असा आरोप केलाय. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहे. महाविकास आघाडीचे नाशिकमधील इतर उमेदवार पोलीस ठाण्यात दाखल होणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपली सभा रद्द करून त्या नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या दिसून रवाना झाल्या आहेत. ही खूप चिंताजनक बाब आहे. हे अतिशय गलिच्छ राजकारण सुरु आहे. आता मी पहिले पोलीस स्टेशनला जाणार आहे. आमच्या कुटुंबातील माणसांवर असे हल्ले होणार असतील तर आम्ही खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासन काय करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या