Kolhapur News : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. या काळात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या काळात राजकीय नेते विविध वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. असाच एक वादग्रस्त वक्तव्य केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 1500 दिलेत, महायुतीला (Mahayuti) मत दिले नाही तर 3000 वसुल करणार, असं वक्तव्य कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव (Megharani Jadhav) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं आहे.
महायुती सरकारनं लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. ही योजना राज्यात लोकप्रिय ठरली आहे. मात्र, योजनेबाबत महायुतीचे काही नेते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 वसुल करणार अस वक्तव्यं केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.करवीर पन्हाळा गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गारीवाडे इथं आयोजीत करण्यात आलेल्या सभेत भाजपच्या महिला पदाधिकारी मेघारानी जाधव बोलत होते.
"1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 वसुल करणार... "
— Adv. Pradnya Pawar (@PradnyaPawar121) November 14, 2024
ह्या हरामखोर मिंदे सरकारच्या नेत्यांची मस्ती पहा. ह्यांची ही मस्ती मोडून काढावी लागेल. भाजप महायुतीचा पराभव करुन महाविकास आघाडीची सत्ता आणावी लागेल.#भाजप_हटाओ_महाराष्ट्र_बचाओ #AntiMaharashtraBJP #BJPhataoDeshBachao pic.twitter.com/xK9OsIdmXE
लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावं लिहून घ्या. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया आहेत, महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा पाहिजे म्हणत आहेत", असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं. त्यानंतर आता भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
कोल्हापूरातील गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर अशा तीन तालुक्यांचा हा करवीर विधानसभा मतदार संघ आहे. कोल्हापूरातील सर्वात मोठा मतदार संघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जात आहे.साल 2019 मध्ये येथे कॉंग्रेसचे पी. एन.पाटील यांचा विजय झाला होता. मागच्या दोन निवडणूकात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. यंदा स्वर्गीय पी.एन. पाटील यांचे पूत्र राहुल पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते चंद्रदीप नरके यांच्यात मुख्य लढत होणार आहे. लोकसभा निवडणूकीत याच मतदार संघातून शाहू महाराज यांना 70 हजाराचे लीड मिळाले होते. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीत या मतदार संघात काय होणार याकडे लक्ष लागलेले आहे.