Shikhar Dhawan Represent Karnali Yaks: भारतीय संघाचा गब्बर अर्थात शिखर धवन त्याच्या क्रिकेट कारकीर्दिची नवीन सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा शिखर आता भारताच्या शेजाऱ्यांसोबत खेळताना दिसणार आहे. तेथील क्रिकेटचा विकास करण्यासाठी गब्बरने हा निर्णय घेतला असून तेथील स्थानिक ट्वेंटी-२० लीगमध्ये गब्बरची फटकेबाजी दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा अनुभव शेजाऱ्यांच्या क्रिकेटपटूंसोबत शेअर करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. शिखरने स्वतः इस्टावर व्हिडीओ पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
गब्बरची 'शिखर' कारकीर्द...शिखरने भारताकडून ३४ कसोटी सामन्यांत ७ शतकं व ५ अर्धशतकांसह २३१५ धावा केल्या आहेत. १६७ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ६७९३ धावा आहेत आणि त्यात १७ शतकं व ३९ अर्धशतकं आहेत. ट्वेंटी-२०त त्याने भारतासाठी ६८ सामन्यांत १७५९ धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये २२२ सामन्यांत गब्बरने ६७६९ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा शिखर सध्या लीजेंड्स लीग क्रिकेट (LLC 2024) मध्ये खेळताना दिसला होता. त्याने आता आणखी एका मोठ्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची तयारी केली आहे. आता तो नेपाळ प्रीमियर लीग (NPL 2024) मध्ये देखील खेळणार आहे. NPL 2024 मध्ये तो कर्णाली याक्सकडून खेळताना दिसणार आहे. नेपाळ प्रीमिअर लीगचे हे पहिलेच पर्व आहे.
आठ संघांचा समावेश असलेल्या NPL 2024 स्पर्धा ३० नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. लीगमध्ये एकूण ३२ सामने खेळले जातील आणि ते आयपीएलच्या फॉरमॅटमध्येच खेळवले जातील. कर्णाली यॅक्सच्या टीमने प्रमोशनसाठी एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये शिखर धवन म्हणाला, "नमस्कार नेपाळ, मी नेपाळ प्रीमियर लीग खेळायला येत आहे. मी कर्नाली यॅक्ससाठी खेळणार आहे, मी नेपाळ आणि तेथील लोकांना भेटायला येत आहे. व्हा तयार."
जेम्स नीशम, मार्टिन गुप्तिल, उन्मुक्त चंद आणि बेन कटिंगसह अन्य अव्वल खेळाडूही नेपाळ प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीत खेळताना दिसतील. कर्नाली यक्स संघात धवन व्यतिरिक्त पाकिस्तानचा मोहम्मद हुसेन तलत, हाँगकाँगचा बाबर हयात आणि वेस्ट इंडिजचा चॅडविक वॉल्टन हे चार परदेशी खेळाडू आहेत.