नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. आज इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात (Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency) काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव (Lucky Jadhav) यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेचा मंडप अचानक उडाला. यामुळे दोन कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर निवडून आलेले विद्यमान आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत महायुतीतील (Mahayuti) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP Ajit Pawar Group) प्रवेश केला आहे. हिरामण खोसकर यांना अजित पवार गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसने लकी जाधव (Lucky Jadhav) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
लकी जाधव यांच्या प्रचारासाठी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी उभारण्यात आलेला मंडप वादळामुळे अचानक उडाला. सभा मंडप उडाल्यामुळे दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर मंडप उडाल्यामुळे सभास्थळी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. तर हेलिपॅडवरून निघालेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचा ताफा पुन्हा माघारी परतला. यानंतर मल्लिकार्जुन खरगे पुन्हा सभा स्थळी दाखल झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या