मावळमध्ये महिला पत्रकाराला उमेदवाराच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याची धमकी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
एबीपी माझा वेब टीम November 14, 2024 06:13 PM

पुणे -  राज्यात निवडणुकांची प्रचार सभा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अशातच एका प्रचारसभेवेळी विरोधात वार्तांकन का करतेस, असा जाब विचारत महिला पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या दोन नातेवाईकांसह चौघांविरोधात लोणावळा पोलीस (Lonawala Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे देखील दाद मागण्यात आली आहे.

लोणावळ्यामध्ये 11 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर यांची पत्रकार परिषद होती. त्यानंतर आरोपींनी संबंधित महिला पत्रकाराला आडवून धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार किशोर भेगडे, संदीप भेगडे व अन्य दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर भेगडे हे तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष आहेत. 

लोणावळ्यात नऊ नोव्हेंबरला संध्याकाळी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे व महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांचे समर्थक आमने-सामने आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याप्रकरणाची चुकीची बातमी दिल्याचा आरोप करीत भेगडे यांच्या समर्थकांनी संबंधित महिला पत्रकाराला जाब विचारला व निवडणुकीनंतर बघून घेण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

या प्रकरणी संबंधित पत्रकार महिलेने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन लेखी तक्रार अर्ज दिला. त्याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश लोणावळा शहर पोलिसांना दिले. त्यानुसार 12 नोव्हेंबरला पत्रकार महिलेची तक्रार नोंदवून घेण्यात आली. 

राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून निषेध

अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांकडून महिला पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली जाण्याच्या प्रकाराचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. विरोधी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारात वारंवार महिलांचा अवमानकारक उल्लेख होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तालुक्यातील 'लाडक्या बहिणीं'वर बापूसाहेब व त्यांच्या समर्थकांचा एवढा राग का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

बापू भेगडेंचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मावळचे अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा एका व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. महिलेला शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ समोर आल्याने आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, ही घटना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत घडल्याचे सांगितले जात आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.