शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
वेदांत नेब November 14, 2024 06:43 PM

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा आता पुढील काही दिवसांत थंडावणार आहेत. मात्र, 18 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मोठ्या प्रचारतोफा धडाडणार असून सर्वच नेत्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या शेवटच्या सभा त्या दिवशी होत आहेत. 18 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे प्रचाराच्या तोफा थंडावत असताना  17 नोव्हेंबरच्या संध्याकाळची प्रचार सभा ही संध्याकाळची शेवटची प्रचार सभा असणार आहे. प्रत्येक पक्षासाठी ही सभा महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे, मुंबईत (Mumbai) शेवटची सभा शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थ मैदानावर घेण्यावर दोन्ही ठाकरे बंधू आग्रही असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला येथे परवानगी देण्यात आली आहे. 17 नोव्हेंबर हा दिवस  बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या त्यांना मानणाऱ्या तमाम शिवसैनिकांसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा. कारण त्यादिवशी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. त्यामुळे शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी उसळणार तर दुसरीकडे स्मारकाच्या बाजूलाच शिवाजीपार्क मैदानावर राज ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. 

17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदान सभेसाठी  उद्धव ठाकरेंना मिळणार की राज ठाकरेंना यावरचा सस्पेन्स आता संपला आहे. शिवतिर्थावर 17 नोव्हेंबरची शेवटची सभा आपल्याला घेता यावी यासाठी दोन्ही ठाकरे बंधू आग्रही असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीसाठीचा अर्ज मनसे पक्षाकडून आधी देण्यात आल्याने नियमानुसार ही परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. दसरा मेळाव्याला घुमणारा उद्धव ठाकरे यांचा आवाज आणि गुढीपाडवा मेळाव्याला घुमणाऱ्या राज ठाकरे यांच्या आवाजापेक्षा यंदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवतीर्थावर घुमणारा ठाकरी आवाज हा अनेक अर्थाने वेगळा  असणार आहे. कारण दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई असणार आहे. शिवतीर्थावर राज ठाकरे यांना परवानगी मिळाल्यानंतर आपले पुत्र माहीम  विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची ही सभा पार पडत आहे. 

पण हाच  17 नोव्हेंबर चा दिवस बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानणाऱ्या तमाम शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचा 12 वा स्मृतिदिन आहे. त्यामुळे एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिनी  स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील हजारो शिवसैनिकांची गर्दी होणार असल्याने इतर कुठल्या पक्षाला या दिवशी सभेसाठी परवानगी दिल्यास  संघर्ष उद्भवू शकतो. त्यामुळे इतर कोणाला परवानगी न देता उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी, यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात आले होते. अगदी निवडणूक आयोगाला सुद्धा या सगळ्या संदर्भात पत्र देण्यात आले. मात्र, त्यास यश न  मिळाल्याने बाळासाहेबांचा स्मृतिदिनी शिवतीर्थावरील स्मृती स्थळावर उद्धव ठाकरेंची होणारी सभा आता बीकेसी मैदानावर घेण्याचं पर्यायी नियोजन आधीच केल्याची माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे अमित ठाकरेंसाठी आणि उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई यांच्या प्रचारार्थ त्यांच्या मतदारसंघात सभा घेताना दिसून येतील. 

मनसेनं आधी केला अर्ज

येथील सभेसाठी मैदान मिळावे म्हणून आमच्या आधी अर्ज हा मनसेने भरला होता, 17 तारीख आणि 6 डिसेंबर हे दोन दिवस राखीव आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची गरज आम्हाला वाटली नाही किंवा आतापर्यंत कोणीही अर्ज केलेला नव्हता, असे शिवसेना ठाकरे गटाचे माहीमचे उमेदवार महेश सावंत यांनी स्पष्ट केले आहे. 

शिवसैनिक व मनसैनिक एकत्र जमणार

शिवाजी पार्क मैदान हे सभेसाठी मिळावं यासाठीचा पक्षांमधील हा काही पहिला संघर्ष नाही. याआधी दसरा मेळाव्याला शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात संघर्ष पाहायला मिळाला होता. लोकसभा निवडणुकीच्यावेळेस सुद्धा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने  शिवतीर्थावर सभेसाठी आग्रह केला होता. लोकसभेप्रमाणे या विधानसभेला सुद्धा पहिला अर्ज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केल्याने त्याच नियमानुसार या वेळी सुद्धा मनसेला सभेची परवानगी मिळाली आहे. जो संघर्ष दसरा मेळाव्याला पाहायला मिळाला जो लोकसभेला पाहायला मिळाला तोच विधानसभेला सुद्धा पाहायला मिळतोय. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर स्मृतीदिनाच्या दिवशी हजाराच्या संख्येने शिवसैनिक जमतील तर दुसरीकडे राज ठाकरेंना शिवतीर्थावर सभेसाठी परवानगी मिळाल्याने हजारोंच्या संख्येने मनसैनिक सुद्धा येतील. शिवतीर्थावर राज ठाकरेंचा आवाज घुमणार तर बीकेसीच्या मैदानावर उद्धव ठाकरेंचा हे निश्चित झालं आहे. मात्र, महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कोणाचा आवाज घुमणार हे 23 तारखेच्या निकालानंतर कळेल.  

मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावरुन पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.